
मुंबई दि. २७ :- श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून, शिक्षण,समाजसेवा, संस्कार आणि सांस्कृतिक उन्नतीचे केंद्र आहे. हे ठिकाण भविष्यात मध्यमवर्गीयांसाठी आरोग्यसेवा, सांस्कृतिक शिक्षण, मातृभाषा संवर्धन यासाठी एक समर्पित केंद्र बनू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. लक्ष्मीनारायण मंदिर हे गेल्या दीडशे वर्षांपासून समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित करत आलेले श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री लक्ष्मी नारायण मंदिराचा १५० वा वर्धापन दिन सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, यांच्यासह विश्वस्त मंडळाचे सदस्य आणि भाविक उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह म्हणाले, सन १८७५ मध्ये विदेशी सत्तेच्या काळात मंदिराच्या माध्यमातून सामाजिक चेतना निर्माण करणारे कार्य महान विभूतींनी केले. या मंदिराचे आणि माधवबाग ट्रस्टचे समाजासाठीचे योगदान कौतुकास्पद आहे. लक्ष्मीनारायण मंदिरचे ट्रस्टच्या ‘शुचिता, संतुलन आणि सत्कर्म’ या मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी केले. २०० व्या वर्षपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताना हे केंद्र केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनानेही समृद्ध व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाचा गौरव करत केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा म्हणाले, या काळात भारताने ऐतिहासिक प्रगती केली आहे. राम मंदिर उभारणी, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, योगाचा जागतिक प्रचार, ऑपरेशन सिंदूर या सारख्या कृतींमुळे भारताचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य झाले असल्याचे श्री. शाह यांनी सांगितले.
सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमातून समाजाला दिशा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लक्ष्मीनारायण मंदिराने गेल्या दीडशे वर्षांत समाजोपयोगी, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आहे. या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे कार्य फक्त मंदिरापुरते मर्यादित नाही, तर समाजसेवा, मदतीचे कार्य, सांस्कृतिक मूल्ये आणि धर्माच पालन या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे आहे. भविष्यात या मंदिर व विश्वस्त मंडळास आवश्यक ती मदत केली जाईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यापूर्वीही आपण या मंदिरात दर्शन घेतले असून आताही दर्शन घेण्याचा योग आला याचा आपणास आनंद आहे. लक्ष्मी नारायण मंदिर श्रद्धेचे प्रतीक आहे. येथे प्रत्यक्ष भगवान वास करत असल्याची भावना गेली १५० वर्षे भक्तांच्या मनात असून येथील सेवा कार्य हे अखंड चालू असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.
तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शन घेतले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/