मुंबई: लोकप्रिय कलाकारांचा चाहतावर्ग पाहता टीव्हीवरील मालिका, कार्यक्रमांना चांगली पसंती मिळू शकते. म्हणून अनेक मोठे चेहरे सध्या छोट्या पडद्यावर दिसत आहेत. उमेश कामात, मुक्ता बर्वे, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संजय नार्वेकर ही कलाकार मंडळी टीव्हीवर झळकताहेत. आता या यादीत आणखी दोन कलाकारांची भर पडत आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे ही जोडी लवकरच ‘माझी तुझी रेशीमगाठ‘ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार असून त्यामध्ये हे दोघंही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
चिमुकलीची चर्चा
मालिकेच्या प्रोमोमध्ये श्रेयससोबत एक चिमुकली दिसत आहे. ही चिमुकली आहे सोशल मीडिया स्टार मायरा. मायराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
श्रेयस आणि प्रार्थना या मालिकेच्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी टीव्हीविश्वात पुनरागमन करताहेत. दोघांनी याच माध्यमापासून करिअरची सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा त्यांना मालिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
- Advertisement -