संजय राऊत यांच्याविरोधातील याचिकांवरील निर्णय राखून ठेवला

संजय राऊत यांच्याविरोधातील याचिकांवरील निर्णय राखून ठेवला
- Advertisement -

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात छळवणुकीचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तिन्ही याचिकांवरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाल्यानंतर न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाने त्यावरील आपला निर्णय राखून ठेवला.

‘राऊत यांच्या आणि माझे पती सुजित पाटकर यांच्या सांगण्यावरून काही व्यक्तींनी माझी छळवणूक केली. त्याविषयी पूर्वी वाकोला पोलिस ठाण्यात दोन आणि माहीम पोलिस ठाण्यात एक एफआयआर नोंदवूनही पोलिसांकडून कारवाई झाली नाही’, असा आरोप महिलेने अॅड. आभा सिंग यांच्यामार्फत तीन याचिका दाखल करून केला आहे. मात्र, राऊत यांनी ज्येष्ठ वकील अॅड. प्रसाद ढाकेफाळकर यांच्यामार्फत आपले म्हणणे मांडून सर्व आरोपांचे खंडन केले. ‘पोलिसांनी तपासाअंती एका प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून दोन प्रकरणांत ए-समरी अहवाल दाखल केले आहेत. न्यायदंडाधिकारी न्यायालयात पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी आहे’, अशी माहिती मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनी गुरुवारच्या सुनावणीत खंडपीठाला दिली.

मात्र, पोलिसांच्या तपासावर आपला विश्वास नसून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी विनंती महिलेतर्फे आभा यांनी केली. तेव्हा, ‘प्रकरण न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या विचाराधीन आहे आणि फौजदारी दंड संहितेच्या कलम १६४ अन्वये तुमचा जबाबही नोंदवण्यात आलेला आहे. मग ते न्यायालय योग्य निर्णय देणार नाही, असे आम्ही गृहित का धरायचे? दाद मागण्यासाठी न्यायालयांचा पदानुक्रम आहे. कनिष्ठ न्यायालयात न्याय मिळाला नाही तर तुम्हाला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग आहेच. तुमच्या प्रकरणात आम्ही फार तर निर्णय लवकर देण्याची विनंती न्यायदंडाधिकारी न्यायालयाला करू शकतो’, असे खंडपीठाने त्यांना सांगितले. त्याविषयी आभा यांनी सहमती दर्शवल्यानंतर खंडपीठाने तिन्ही याचिकांवरील आपले निर्णय राखून ठेवले.

‘त्या’ याचिकेवर सोमवारी सुनावणी

या याचिकादार महिलेने बनावट पीएच.डी. पदवी मिळवली असल्याचा आरोप आहे. एका सामाजिक कार्यकर्तीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी तिच्याविरोधात एफआयआर नोंदवून तिला अटक केली. मागील दीड महिन्यापासून ती अटकेत आहे. ‘राऊत यांच्याविरोधात याचिका केल्यानेच गंभीर कलमे लावून पोलिसांनी मला अटक केली’, असा दावा करत या महिलेने आणखी एक याचिका केली आहे. ‘संबंधित पदवी मला पतीनेच मिळवून दिली आणि आता त्यानेच त्या सामाजिक कार्यकर्तीला कागदपत्रे पुरवली’, असा आरोप महिलेने गुरुवारी आभा यांच्यामार्फत केला. त्यामुळे खंडपीठाने त्या दोघांना याचिकेत प्रतिवादी करण्याची मुभा याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली.

Source link

- Advertisement -