Home शहरे मुंबई संत्र्यांसाठी विशेष सर्वंकष पॅकेज : कृषिमंत्री

संत्र्यांसाठी विशेष सर्वंकष पॅकेज : कृषिमंत्री

मुंबई :
विदर्भाचे मुख्य फळपीक संत्र्याच्या लागवडीला चालना देण्यासाठी नाविण्यपूर्ण संत्रा धोरण तयार करुन राबविण्यात येईल. संत्रा लागवडीला चालना देण्यासह उत्पादकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी शेतकरी घटक मानून सर्वंकष पॅकेज तयार करण्यात येईल, असे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.

संत्रा धोरणाच्या अनुषंगाने डॉ. बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते म्हणाले, संत्रा पिकांच्या लागवडीसाठी कलमे आणि नव्या तसेच जुन्या बागांना पुनर्विकास, लघु आवेष्टन गृह (पॅकेजिंक हाऊस) आदींसाठी पॅकेज तयार करण्यात येईल. हे पॅकेज तयार करण्यासाठी 1 ते 2 हेक्टरपर्यंतचे क्षेत्र घटक मानण्यात येईल. नवीन लागवड आणि जुनी लागवड यासाठी वेगवेगळे निकष या पॅकेजमध्ये असतील. नर्सरी बागांची निर्मिती, मोठे पॅकेजिंग युनिट आदी मोठ्या बाबींसाठी शेतकरी गटांना मदत दिली जाईल, असेही डॉ. बोंडे म्हणाले. बैठकीस कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, कृषी सहसंचालक (फलोत्पादन) शिरीष जमदाडे, संशोधन संचालक व्ही. के. खर्चे, फलोत्पादन उपसंचालक सु.वि. भालेराव आदी उपस्थित होते.