Home ताज्या बातम्या संपूर्ण शहरात कर्फ्यू : पोलीस आयुक्‍त

संपूर्ण शहरात कर्फ्यू : पोलीस आयुक्‍त

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

पुणे – शहरातील काही भागांत करोनाबाधितांची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. संपर्कात आल्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पेठांसह चार पोलीस ठाणे हद्दीत महापालिकेने सील केलेल्या भागात दि.7 ते 14 एप्रिलदरम्यान संचारबंदी (कर्फ्यू) आहे. शहरात करोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन टप्प्याटप्याने हा कर्फ्यू वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी दिली. यावेळी सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्‍त संभाजी पाटील, शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.

पुण्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून संचारबंदी आणि जमावबंदी आदेश आहेत. त्यानंतरही विशिष्ट भागांत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परस्पर संपर्कामुळे हा संसर्ग व प्रसार वाढण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्‍तांनी दि. 6 एप्रिलच्या रात्रीपासून मध्यवर्ती पेठांचा भाग तसेच पूर्व भाग सील करण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही मंगळवारी नागरिक घराबाहेर पडत होते. त्यावर पोलिसांनी खडक, फरासखाना, स्वारगेट आणि कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील रस्ते, गल्ल्यांमधील भागात संचारबंदी आदेश दिला. या भागात फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपासून सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी व परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे.

नऱ्हे, हिंगणे, धायरी आणि परिसरातील रस्ते बंद करण्यात येत आहेत. सिंहगड रस्ता येथील अनेक भागांत लोकांना होम क्वारंटाइनचे आदेश दिलेल्यांपैकी काही जण करोनाबाधित झाले. लॉकडाउन पाळताना नसल्यामुळे या परिसरातही कर्फ्यू लावण्यात आला आहे. सिंहगड रोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके म्हणाले, “या भागात होम क्वारंटाइन केलेल्यांपैकी काही जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे सकाळपासून या भागात कर्फ्यूची अंमलबजावणी केली आहे.

किराणा भरून ठेवा
नागरिक दररोज भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. शहरातील करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता टप्प्याटप्याने कर्फ्यू इतरही भागात लावला जावू शकतो. यामुळे नागरिकांनी दहा दिवसांचा किराणा एकदाच भरुन ठेवा, असे पोलीस आयुक्‍त म्हणाले.

दवाखान्यास सवलत
संरक्षण दल, आरोग्य विभाग, दवाखाना, मेडिकल, ऍब्युलन्स, करोना प्रतिबंधक उपाययोजनाशी संबंधित महानगरपालिका व शासकिय अधिकारी-कर्मचारी यांना सवलत देण्यात आली आहे.

दुकाने दोन तास
जीवनावश्‍यक वस्तू व सेवा पुरविणारी दुकाने सकाळी फक्‍त दोन तासांसाठी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी टाळून सोशल डिस्टसिंगचा अवलंब करावा, अन्यथा सदर दुकान तत्काळ बंद करण्यात येईल. नागरिकांनी मास्क, हॅन्डग्लोव्हज, तसेच सॅनिटायझरचा वापर करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.