Home ताज्या बातम्या संभाजीराजे छत्रपतींवर सरकारचं खास लक्ष? गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

संभाजीराजे छत्रपतींवर सरकारचं खास लक्ष? गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

0
संभाजीराजे छत्रपतींवर सरकारचं खास लक्ष? गृहमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

हायलाइट्स:

  • संभाजीराजेंच्या आरोपावर गृहमंत्र्यांचा स्पष्टीकरण
  • कार्यक्रमात कोणी विघ्न आणू नये म्हणून केला होता बंदोबस्त
  • गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर संभाजीराजेंचंही समाधान

मुंबई :संभाजीराजे छत्रपती यांनी सरकार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र संभाजीराजेंच्या या आरोपावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं असून संभाजीराजे छत्रपतींवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘छत्रपती संभाजीराजे राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता,’ अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.

‘हा विषय संपला आहे’; संभाजीराजेंची माहिती

गृहमंत्र्यांनी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या वादावर पडदा टाकला आहे. ‘आताच गृहमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीच्या ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून हा विषय संपला आहे,’ असा खुलासा संभाजीराजेंकडून करण्यात आला आहे.

नेमका काय होता संभाजीराजेंचा आरोप?

संभाजीराजे यांनी आता हा विषय संपला असल्याचं म्हटलं असलं तरीही त्यांनी आधी गंभीर आरोप करत राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?’ असा गंभीर सवाल संभाजीराजे यांनी विचारला होता.

दरम्यान, संभाजीराजे हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्याधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यानच हा सगळा प्रकार घडला.

Source link