संवेदनशील भौगोलिक परिस्थिती असलेल्या महाड तालुक्याच्या महसूल यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय -पालकमंत्री कु.आदिती तटकरे – महासंवाद

संवेदनशील भौगोलिक परिस्थिती असलेल्या महाड तालुक्याच्या महसूल यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय -पालकमंत्री कु.आदिती तटकरे – महासंवाद
- Advertisement -

अलिबाग, दि.28 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याच्या भौगोलिक स्थितीनुसार या तालुक्यात सखल पृष्ठभाग, सावित्री नदीची पावसाळ्यातील पाण्याची वाढती पातळी, सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमान व आपतकालीन स्थितीमध्ये महसूल व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयांतर्गत युद्ध पातळीवर कार्य चालते. अशा परिस्थितींमध्ये उपविभागीय अधिकारी (महसूल) व तहसिलदार या महसूली कार्यालयांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे, ही कामे प्राधान्याने होण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुराव्यातून प्रगतीकार्य होत आहे, असे जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले.

महाड तालुक्यात नव्या प्रांत अधिकारी व तहसिलदार या कार्यालयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवन इमारतींच्या बांधकामासाठी महसूल विभागाने जागा प्रदान केली आहे. ही जागा महाड तालुक्यातील मौजे चांभारखिंड येथील जल विद्युत प्रकल्पाची जागा जलसिंचन विभागाने या महत्त्वाच्या महसूल कार्यालयांसाठी उपलब्ध करुन दिली आहे, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी राज्याचे मा.मुख्यमंत्री ना.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे, जलसंपदा मंत्री ना.श्री.जयंत पाटील यांचे व महसूल मंत्री ना.श्री.बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले.

 मौजे चांभारखिंड येथील 1.62.70 हे.आर जमीन महाड तालुका मध्यवर्ती प्रशासकीय भवन इमारतीसाठी प्रदान करण्याबाबत शासन आदेश आज महसूल विभागाने निर्गमित केला आहे. महाड तालुक्यातील महसूल विभागाच्या जुन्या इमारती या जीर्ण झाल्या असून मागील काही वर्षापासून येत असलेल्या महापूर व चक्रीवादळासारख्या आपत्तीजन्य काळात सर्वच बाजूने सक्षमपणे कार्यरत राहण्यासाठी या कार्यालयांच्या नव्या इमारती उभारणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक शासकीय जागा मिळण्याबाबत यशस्वी कार्य या निमित्ताने घडत आहे.

 रायगड जिल्ह्यातील वाढते औद्योगिकरण, कोकण रेल्वे, मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महत्त्वाचा महामार्ग व इतर दळणवळणाच्या माध्यमातून मुंबई लगतच्या परिसरातून वाहतूक व रहदारीचे प्रमाणही मोठे आहे. महाड तालुक्यात वाढते शहरीकरण व नागरीकरणाच्यादृष्टीने येथील महसूल व्यवस्थेतील महत्त्वाच्या इमारतीचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत कार्यालय) व तहसिलदार कार्यालयाच्या नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने नवीन इमारत बांधकाम विकास प्रक्रीया पूर्णत्व:स येणार असल्याने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

00000

- Advertisement -