संशोधन व उत्तम मनुष्यबळ निर्मितीमध्ये एलआयटीचे अमुल्य योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संशोधन व उत्तम मनुष्यबळ निर्मितीमध्ये एलआयटीचे अमुल्य योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -

नागपूर, दि. 24 : रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रात लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेने (एलआयटी) बहुमोल कामगिरी केली आहे. तसेच संशोधन व उत्तम मनुष्यबळ निर्मितीमध्ये अमुल्य योगदान दिले आहे. येत्या काळात देशाला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी या संस्थेचा मोलाचा वाटा असेल, असा  विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

एलआयटी संस्थेच्या जागतिक माजी विद्यार्थी संमलेनात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर, एलआयटी संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभय देशपांडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, 80 वर्षाच्या देदिप्यमान इतिहास असणाऱ्या एलआयटी संस्थेने महाराष्ट्र  व देशाला उत्तमोत्तम संशोधन व मनुष्यबळ दिले आहे. या संस्थेने काळानुरुप बदल करीत रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेतली आहे. स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याची या संस्थेची मागणी व योग्यता असून नियमानुरुप या संस्थेला हा दर्जा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची योजना आहे. या शैक्षणिक धोरणात देशातील महत्वाच्या संस्थांना स्वायत्ततेचा व अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

एलआयटीच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा   

विद्यार्थी जीवनात आपण  मित्रांना भेटण्यासाठी एलआयटीच्या वसतीगृहात येत असू असे सांगून श्री फडणवीस यांनी या संस्थेशी असलेल्या ऋणानुबंधावर प्रकाश टाकला. भारत ही जगातील पाचवी मोठी आर्थिक सत्ता असून येत्या काळात देशाला या श्रेणीत तिसऱ्या स्थानावर घेऊन जायचे आहे. त्यासाठी संशोधन, कुशल मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी एलआयटी संस्था मोलाचे योगदान देऊ शकते, असे सांगून राज्य शासन आणि विद्यापीठ या संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

एलआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

या कार्यक्रमात  श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध श्रेणीत माजी विद्यार्थ्यांना ज्वेल ऑफ एलआयटी आणि  युथ आयकॉन‘ पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. द्वारकानाथ काळेडॉ. अतुल वैद्यप्रशांत नसेरीसुब्रह्मण्यम सर्माऋतुराज गोविलकरविनोद  कालकोटवार, किशोर ढोकणेअनिल घुबे यांचा ज्वेल ऑफ एलआयटी पुरस्काराने गौरव करण्यात आला. योगेंद्र शास्त्री यांना युथ आयकॉन‘ पुरस्काराने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी, श्री. फडणवीस यांनी एलआयटीचे संस्थापक राव बहादूर लक्ष्मीनारायण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. संस्थेच्या परिसरातील डॉ. पी.एस.मेने मेमोरियल पायलट प्लांटचे उद्घाटन त्यांनी केले. संस्थेच्या लिटा संवाद‘ या वार्षिकेचे उपमुख्यमंत्र्यांच्या  हस्ते विमोचन करण्यात आले.

 

000

- Advertisement -