समतोल विकास साधताना प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर भर – रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे – महासंवाद

समतोल विकास साधताना प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर भर – रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे – महासंवाद
- Advertisement -

मान्यवरांची स्मृतिस्तंभ येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली

बीड, दि. 17 (जि. मा. का.) : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश करताना पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नियोजन करण्यावर शासनाचा भर राहील. बीड जिल्ह्याचा समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी ग्वाही रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या बीड जिल्ह्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस मुख्यालय मैदान येथे झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून ध्वजारोहणानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी जिल्ह्याचा विकासाचा आढावा तसेच शासनाने घेतलेल्या विकासात्मक निर्णयांचा आढावा घेतला. ते म्हणाले, शंखी गोगलगायीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार निधीचे वाटप करण्यात येत आहे. तसेच लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाने पशुचा मृत्यू झाल्यास पशुपालकांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 47 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25 टक्के अग्रीम देण्याबाबत नुकतीच अधिसूचना करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे, असे ते म्हणाले.

मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, सन 2017 -18 पासून पुढील तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने पात्र लाभार्थींच्या माहिती संकलनाचे काम गतीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या.

अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा आढावा घेताना मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, या नवीन रेल्वे मार्गाचे मूळ भूसंपादन १२६४.८३ हेक्टर संपादित झाले आहे. तसेच अतिरीक्त भूसंपादन 318.5892 हेक्टरचा ताबा देण्यात आला आहे. उर्वरित भूसंपादन 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असून हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात दिनांक 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी यंत्रणांना दिले.

बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या थोडेसे मायबापासाठी पण… अंतर्गत सावली उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेल्या क्यू आर कोड डिजीटल ओळखपत्र, ऊसतोड मजुरांसाठीच्या ओळखपत्रासाठी विकसित केलेले सॉफ्टवेअर तसेच मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून केलेली कामगिरी याची दखल घेऊन बीड जिल्हा परिषदेचे विशेष अभिनंदन मंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी केले.   प्रारंभी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर मंत्रीमहोदयांनी परेड निरीक्षण केले.

पोलीस विभागाच्या वतीने परेड संचलन करण्यात आले. परेड संचलनामध्ये पोलीस विभागाचे पुरुष व महिला पथक, गृह रक्षक दलाचे पथक, बलभीम महाविद्यालय, सैनिक विद्यालय आदिंचे एनसीसी पथक, शिवाजी विद्यालय व राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयाचे स्काऊट गाईड पथक, पोलीस बँड, पोलीस विभागाची रुग्णवाहिका, बीड नगरपरिषदेचे अग्निशमन विभागाचे वाहन आदिंनी सहभाग घेतला. यावेळी मंत्री संदिपान भुमरे यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदिंची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

स्मृतिस्तंभ येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली

दरम्यान, ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी मंत्री संदिपान भुमरे यांनी स्मृतिस्तंभ, प्रियदर्शनी उद्यान येथे मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासह बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आदिंसह वरिष्ठ प्रमुख अधिकारी तसेच स्वातंत्र्यसैनिक विठू गायके, कारभारी सानप, श्रीमती सरस्वती सुकटे, रुक्मिणी दोडके आदिंनी पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस पथकाने धून वाजवून व हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

या दोन्ही कार्यक्रमास अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीड उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद प्रशासक नामदेव टिळेकर यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

- Advertisement -