पुणे, दि. 29 : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा वापर हा अपरिहार्य असला तरी सामाजिक शांततेला धक्का लागणार नाही आणि सामाजिक सलोखा जपला जाईल याची दक्षता घ्यावी, असे मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.
‘डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये ‘राजकारणातला सोशल मीडिया’ या विषयावर त्या बोलत होत्या. आमदार रोहित पवार, देवेंद्र भुयार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम परिसंवादामध्ये सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापन विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे यांनी निवेदन केले.
राज्यमंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या, समाजमाध्यमांचा वापर व्यक्तिमत्वाला साजेसा असावा. समाज माध्यमाद्वारे वेगाने संदेश पोहोचत असले तरी प्रत्यक्ष आणि थेट संवादाला पर्याय नाही.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार, रोहित पवार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम यांनी ते कशा प्रकारे समाज माध्यमांचा वापर करतात तसेच समाज माध्यमांचा वापर करत असताना त्यांना आलेले अनुभव मनोगतात सांगितले.
****