Home बातम्या ऐतिहासिक समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे – पालक न्यायमूर्ती विनय जोशी

समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे – पालक न्यायमूर्ती विनय जोशी

0
समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचली पाहिजे – पालक न्यायमूर्ती विनय जोशी

चंद्रपूर, दि. 9 :  भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क व कर्तव्य प्रदान केले आहे. या मुलभूत हक्काची व कर्तव्याची जपणूक करण्यासाठी न्यायव्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. सामान्य जनतेचा न्यायप्रणालीवर विश्वास असल्यामुळे समाजाच्या तळागाळापर्यंत न्यायदानाची प्रक्रिया पोहचविण्यासाठी चांगले काम करा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांनी केले.

सावली (जि.चंद्रपूर) येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल, दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा सावली येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अक्षय जगताप, चंद्रपूर जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर उपस्थित होते.

सावली येथील न्यायालयाच्या नूतन वास्तुमधून न्यायदानाचे काम अविरत सुरू राहील, असे सांगून पालक न्यायमूर्ती विनय जोशी म्हणाले, जनतेचा न्याय प्रणालीवर विश्वास आहे. न्यायाधीश आणि वकिलांनी हा विश्वास कायम राहण्यासाठी प्रयत्नशील राहावे. समाजातील गरीब, वंचित आदी घटकांना समान न्याय देण्याची प्रक्रिया न्यायालय करते. त्यामुळे सर्वांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे. ‘सत्यमेव जयते’ या ब्रीद वाक्या नुसार न्यायाची प्रक्रिया आपल्याला समोर न्यायची आहे.

न्यायालयात दाखल होणा-या प्रकरणांपैकी 50 टक्के प्रकरणे ही जिल्हा न्यायालयात जातात. पुढे उच्च न्यायालय व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे जाण्याची संख्या ही कमीकमी होत जाते. त्यामुळे तालुका न्यायालयातच न्याय झाला तर पक्षकारांना दिलासा मिळतो. त्या अपेक्षेने काम करा. सध्या सावली येथील न्यायालयात एक न्यायाधीश कार्यरत आहे. मात्र येथील प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता येथे आणखी एक न्यायाधीश दिला जाईल.

सुरवातीला भाड्याच्या जागेवर असलेल्या न्यायालयाला आता स्वत:च्या मालकीची जागा आणि इमारत उपलब्ध झाली आहे. ही वास्तु उभी करण्यात सर्वांचे योगदान आहे. या इमारतीमध्ये न्यायाधीश, महिला वकील आणि पक्षकारांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. येथून सर्व पक्षकार समाधानी होऊन जाईल. तसेच दृष्ट प्रवृत्तीला जबर बसेल, असे न्यायदान होऊ द्या, असेही न्यायमूर्ती श्री. जोशी यांनी सांगितले.

22 वर्षानंतर स्वप्न पूर्ण : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अग्रवाल

सावली तालुक्यात 1999 मध्ये न्यायालय सुरू झाले. 4 ऑगस्ट 2007 मध्ये इमारतीकरीता जमीन उपलब्ध झाली. बराच कालावधीनंतर 7 मार्च 2017 ला इमारतीच्या बांधकामाची परवानगी मिळाली व 25 जानेवारी 2018 पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात झाली. 6 कोटी 1 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा, सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंगचा समावेश आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 7 सप्टेंबर 2022 ताबा मिळाल्यानंतर आज (दि.9 ऑक्टोबर) तब्बल 22 वर्षानंतर एक स्वप्न पूर्ण होत असल्याचे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

तत्पूर्वी पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या हस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर यांनी केले. संचालन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी आणि दिवाणी न्यायाधीश एन.एन. बेदरकर यांनी तर आभार सावलीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षय जगताप यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश (प्रथम श्रेणी) गिरीश भालचंद्र, जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रशांत काळे यांच्यासह सावलीच्या नगराध्यक्षा लता लाकडे, तहसीलदार परिक्षीत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी मनिषा वाझाडे, ठाणेदार आशिष बोरकर, न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि नागरिक उपस्थित होते.