समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

समाजात सकारात्मकता आणण्यासाठी मूल्यांची पेरणी व्हावी-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
- Advertisement -

पुणे दि.१६: उत्तम कार्यासाठी चांगला दृष्टिकोन आवश्यक आहे. समाजात सकारात्मकता आणण्यासाठी सेवाकार्य करताना असा चांगला दृष्टिकोन ठेऊन  मूल्यांची पेरणी व्हावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे हॉटेल हयात येथे आयोजित  ‘व्रतस्थ सन्मान सोहळा २०२२’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला इस्कॉनचे गौर गोपाळ दास, पुढारीचे अध्यक्ष तथा समूह संपादक योगेश जाधव, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, चांगल्या कामाचे कौतुक फारसे होत नाही. मात्र समाजातील काही व्यक्ती आणि संस्थांनी चांगल्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. प्रेम आणि सन्मानामुळे अधिक चांगल्या कार्याची प्रेरणा मिळते. समाजात प्रत्येक कालखंडात चांगल्या व्यक्ती असतात. त्यांचा शोध घेऊन त्यांचे कौतुक केल्यास त्यांना सामाजिक कार्यासाठी नवा हुरूप येतो. कार्यक्रमात सन्मानित व्यक्तींकडून भविष्यात उत्तम कामगिरी घडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गौर गोपाल दास म्हणाले, समाधान, सेवेची संधी आणि जनतेचे प्रेम हे कोणत्याही कार्यासाठी असलेले सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहेत. या तिन्ही पुरस्कारांच्या आधारे पुरस्कार विजेत्यांकडून जनतेची सेवा घडेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री. जाधव आणि श्री. बाविस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात श्री.जोशी यांनी व्रतस्थ सन्मान सोहळ्याविषयी माहिती दिली. राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -