मुंबई: महाराष्ट्र जलक्रीडा धोरणात जीप पॅरासेलिंगला परवानगी देण्यात येत नाही. जीप पॅरासेलिंग हा प्रकार अनधिकृत व बेकायदा असल्याने मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जीपद्वारे पॅरासेलिंग करणाऱ्या मालकाच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंगसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती, अशी माहिती पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानसभेत दिली. मुरुडच्या पॅरासेलिंग अपघात प्रकरणी चौकशी करून एका महिन्यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
रायगड जिह्यातल्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करताना दोर तुटून पन्नास फुटांवरून खाली कोसळल्याने वेदांत पवार या पंधरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर मुलाचे वडील गणेश पवार हे गंभीर जखमी झाले. या अपघाताबाबत अतुल भातखळकर, सुनील शिंदे आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील पर्यटनस्थळांवर बेकायदेशीर पॅरासेलिंग करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली. त्यावर उत्तर देताना पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली येथील इंडियन इस्टिटय़ूट ऑफ स्क्युबा डायव्हिंग ऍण्ड ऍक्वाटिक स्पोर्टस या प्रशिक्षण केंद्रामार्फत पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येकी पंचवीस अशा एकूण 100 युवकांना बीच लाइफ गार्डचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन निवास असलेले वेळणेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे व तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी सुरक्षा विषयक सूचनांचे फलक लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जलक्रीडा धोरणात जीप पॅरासेलिंग नाही
महाराष्ट्र जलक्रीडा धोरण 2015 अंतर्गत जलक्रीडा धोरणातील खेळाचे प्रकार ठरवण्यात आले आहेत. जीप पॅरासेलिंग हा या धोरणात नसल्यामुळे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून जीप पॅरासेलिंगला परवानगी देण्यात येत नाही. मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनधिकृत-बेकायदेशीर प्रकारे जीपद्वारे पॅरासेलिंग करणाऱ्या मालकाच्या व कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिह्यातील वरसोली, किहिम, नागाव, अलिबागसह अन्य तेरा ठिकाणी, ठाणे जिह्यातील वसई, मांडवा, रत्नागिरी जिह्यातील आरेवारे, हर्णे, गणपतीपुळे आदी आठ ठिकाणी व सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण या सर्व ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या जलक्रीडा संदर्भातील नियंत्रण व अधिकार हे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाला दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.