औरंगाबाद, दि.05 (विमाका) :- स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे हे तुलनेने सोपे असून आयुष्याची परीक्षा उत्तीर्ण होणे हे खरे आव्हान आहे. ते यशस्वीरित्या पेलण्यासाठी तुमची माणूस म्हणून समतोल आणि परिपूर्ण जडणघडण सकस होणे गरजेचे आहे. कारण माणूस म्हणून समृध्द होत जाणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे समजून घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्लॅन बी म्हणून एक उत्तम पर्याय तयार ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी आज येथे केले.
‘दोनवर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’या मोहिमेंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने औरंगाबाद विभागीय माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सचित्र प्रदर्शनाचे आयोजन 1 ते 5 मे 2022 या कालावधीत सिमंत मंगल कार्यालय, जिल्हा परिषद समोर, औरंगपूरा, औरंगाबाद येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनास भेट देण्यास आलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत असताना श्री.बागुल बोलत होते.
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपली ग्रहणक्षमता आणि लढण्याची चिकाटी या दोन्ही गोष्टी दिवसागणिक वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. आजच्या पिढीला तात्कालिक ध्येय साध्य करण्याच्या प्रेरणेने झपाटून अभ्यास करण्याची, ते प्राप्त करण्याची जी महत्वाकांक्षा आहे. त्या महत्वाकांक्षेला वास्तविक परिस्थितीची जाण असण गरजेचे आहे. दरवर्षी अनेक विद्याशाखांचे काही लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या विविध पदांसाठी जीवतोड मेहनत करतात. मात्र, प्रत्यक्षात उपलब्ध पदांची संख्या त्या तुलनेत कमी असते. या विरोधाभासाला समजून घेऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसोबत आपल्या अंगभूत क्षमता ओळखून आपल्या भविष्यासाठी योग्य पर्याय प्लॅन बी म्हणून वेळीच तयार ठेवला पाहिजे. जेणेकरुन परीक्षेत अपेक्षित यश प्राप्त झाले नाही, तरीही त्यांने खचून न जाता ‘प्लॅन बी’ वर यशस्वी वाटचाल करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये कायम राहील. या व्यापक दृष्टीकोनातून आयुष्याला आकार देत असताना जगण समृध्द करणारा व्यासंग जाणीवपूर्वक जोपासणे, जगण्याच्या विविध टप्प्यांवर तो अद्ययावत ठेवणे आणि अवांतर वाचनातून चिंतनाची उपयुक्त सवय आपल्या स्वभावाचा भाग बनविणे गरजेचे आहे.
माणूस म्हणून जगताना भवतालाबद्दलची आपली संवेदनशीलता, विविध विषयांच्या वाचनातून वाढत जाणारे आकलन, स्वत:ची एक भूमिका घेऊन विचार करण्याची पध्दत या सर्व गोष्टींचा परिपाक यातून आपले व्यक्तित्व घडत असते. त्या व्यक्तित्वाची चाचणी मुलाखत घेणाऱ्या तज्ज्ञांद्वारे होत असते. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अवतीभोवतींच्या घटना, जगण्याच्या शैलीत होत असलेले बदल हे चाणाक्षपणे टिपले पाहिजे. या निरिक्षणातून व्यवसायाच्या, करीअरच्या विविध संधी निर्माण होतात. या दृष्टीने विद्यार्थ्यांनी सतर्कतेने निरीक्षणशक्ती आणि व्यासंगी राहण्यावर भर द्यावा. गर्दीचा एक भाग न होता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे आवाहन श्री.बागुल यांनी यावेळी केले.
* * * * *