छत्रपती संभाजीनगर, दि. २९ (जिमाका): समृद्धी महामार्गालगत टाकळीवाडी (ता. गंगापूर) येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली असून खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यानची (३० किमी अंतर-हडस पिंपळ गाव ते माळीवाडा) वाहतूक धुळे – सोलापूर महामार्गावरून वळविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कळविले आहे.
आज सायं. ५ वा. सुमारास टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली. या घटनेची प्रशासनाने तात्काळ दखल घेत, त्वरित उपाययोजना सुरु केल्या. घटनास्थळी तात्काळ गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले. तसेच अग्निशमन यंत्रणा सज्ज करण्यात आली.
वाहतूक वळवली
तथापी, खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यान ३० किमी वरील वाहतूक धुळे – सोलापूर महामार्गावरून वळवण्यात आली आहे. मुंबईकडून जाणारी वाहने हे हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून उतरून धुळे – सोलापूर महामार्गावर जातील व माळीवाडा येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील. नागपूरकडून येणारी वाहने माळीवाडा इंटरचेंजवरून धुळे – सोलापूर महामार्गावर येतील व हडस पिपंळगाव येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येतील.
रहदारी धुळे – सोलापूर महामार्ग वरून वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सांगितले.
दरम्यान गेल कंपनीच्या तज्ज्ञांनी दोन्हीही बाजूकडील व्हॉलव्ह बंद केले असून पाईपलाईन मधील दाब कमी होत आहे. लवकरच रहदारी सुरळीत होईल, यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करीत असून जिल्हाधिकारी व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
अधिक माहितीसाठी समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष क्रमांक 1800 233 22 33 व 8181818155 वर संपर्क साधता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

०००
















WhatsApp