हायलाइट्स:
- प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
- संजय राऊत म्हणाले, सरनाईक यांच्या पत्रातील एक मुद्दा महत्त्वाचा
- सरनाईक यांना विनाकारण त्रास कोण देतंय?; राऊतांचा सवाल
वाचा: शिवसेनेतून पुन्हा युतीची हाक; ठाण्यातील आमदाराच्या पत्रामुळं खळबळ
संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्या आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे? ते पत्रं खरं असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असं त्या पत्रात म्हटलं आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतंय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणं गरजेचं आहे’, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा: प्रताप सरनाईकांची मोदींशी पुन्हा जुळवून घेण्याची विनंती; भाजप म्हणते…
‘टॉप्स सेक्युरिटी’ घोटाळ्याच्या प्रकरणात प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ते कायदेशीर लढाई लढत आहेत. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी याबाबतचा उल्लेख प्रामुख्यानं केला आहे. ‘कोणताही गुन्हा नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय यंत्रणेचा दलाल असलेल्या माजी खासदाराकडून बदनामी सुरू आहे. आम्हाला टार्गेट करताना आमच्या कुटुंबीयांवरही आघात होत आहे. एका प्रकरणातून सुटल्यानंतर जाणीवपूर्वक दुसऱ्या प्रकरणात गुंतवलं जात आहे. त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या प्रकरणात अडकवलं जात आहे. भाजपशी जुळवून घेतल्यास हे कुठेतरी थांबेल, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. सरनाईक यांच्या पत्रातील याच मुद्द्याला धरून संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यापेक्षा अधिक काही बोलण्यासारखं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा: नाना पटोलेंचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर म्हणाले…