Home ताज्या बातम्या सर्वसामान्यांना केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

सर्वसामान्यांना केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

0
सर्वसामान्यांना केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

पुणे, दि. 1: जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या.

पुणे जिल्हा परिषदेची आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार राहूल कूल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे, जामसिंग गिरासे, मिलिंद टोणपे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा प्रत्येक महिन्यात घेण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, केंद्राच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव गतीने तयार करणे, मंजुरीसाठी पाठवणे तसेच त्यांचा केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. केंद्र तसेच राज्याच्या अधिकाधिक योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत, अशाही सूचना श्री. पाटील यांनी केल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागांद्वारे राबवण्यात येत असलेल्या योजना व कामांची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी बांधकाम, रस्ते, शाळा सुधार योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असे सांगतानाच जनतेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्राधान्याने निधीची तरतूद ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन

तत्पूर्वी जिल्हा परिषदेत उभारलेल्या विकास योजना निरीक्षण कक्षाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षामार्फत जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांच्या आर्थिक, भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यासह संगणकीय पद्धतीने सनियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे ही कामे गतीने मार्गी लावण्यासाठी या कक्षाचा उपयोग होईल असे मंत्री पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी श्री. प्रसाद यांनी विविध विभागांच्या कामाचा तसेच आर्थिक बाबींचा आढावा सादर केला. फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, जलशक्ती मिशनअंतर्गत लघु पाटबंधारे तलावांचे गाळ काढण्याचे काम, अंगणवाडी सुधार, ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम, कृषी विभागाच्या योजना, यशवंत घरकुल योजना आदींविषयी सादरीकरण केले. पशुंमधील लंपी आजारावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेने गतीने लसीकरण केल्याचे त्यांनी सांगितले.

पदोन्नती मिळालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पदोन्नती आदेश मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच लम्पी स्कीन आजारामुळे पशू दगावलेल्या पशुपालकांना मदतीचे धनादेशही वितरीत करण्यात आले.

****