सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी कटिबध्द व्हा- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर – महासंवाद

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी कटिबध्द व्हा- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर – महासंवाद
- Advertisement -

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी कटिबध्द व्हा- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर – महासंवाद

नागपूर,दि. २० : नागपूर आणि विदर्भात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प, मिहानसह इतर रोजगार व स्वयंरोजगाराची निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावर संधी लक्षात घेता सर्वच उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या प्रमाणात घरांची गरज भासणार आहे. उच्च उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट यांच्यासह सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा कटिबध्द असून यादृष्टीने विविध गृहनिर्माण प्रकल्पांचे नियोजन करण्याचे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विदर्भातील म्हाडाअंतर्गत सूरु असलेल्या विविध विकास योजनांचा आढावा त्यांनी आज घेतला. येथील म्हाडा कार्यालयात आयोजित या बैठकीस मुख्य अधिकारी महेशकुमार मेघमाळे, कार्यकारी अभियंता रेणूका अवताडे, उपमुख्य अधिकारी दक्षता गोळे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विदर्भातील हिंगणघाटसह काही शहरात म्हाडा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली घरे शिल्लक आहेत. हिंगणघाट येथे उपलब्ध असलेली घरांची संख्या लक्षात घेता याचा लाभ पोलीसांना देता येऊ शकेल. यादृष्टीने  पोलीस विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. जुन्या झालेल्या जीर्ण इमारती यांचा पुनर्विकास, विकसित भूखंड व परवडणारी घरे, प्रधान आवास योजनांची यशस्वी अंमलबजावणी या तीन पातळ्यांवर एक दर्जेदार काम म्हाडा निर्माण करु शकते. यादृष्टीने अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेसह हाती घेतल्या जाणाऱ्या योजनांच्या यशस्वीतेसाठी अधिक तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

अनेक महानगरांमध्ये म्हाडाच्या योजना मोक्याच्या जागेवर आहेत. अशा योजना फार पूर्वी साकारल्या असून अनेक ठिकाणी याची नाजूक स्थिती झालेली आहे. अशा योजनांचा पुनर्विकास करतांना रोजगार निर्मितीच्या दृष्टीने त्या ठिकाणी व्यावसायासंदर्भात आस्थापनांचे नियोजन करुन आर्थिकदृष्टया हे प्रकल्प सक्षम कसे करता येतील यादृष्टीने भर देण्यास त्यांनी सांगितले.

नागपूर येथे एम्प्रेस मिलमधील जागेवर साकारणारे कापड वाणिज्य संकुल, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये म्हाडांच्या विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रधानमंत्री आवास योजना, नवीन चंद्रपूर, औद्योगिक कामगारांकरीता गृह निर्माण योजना, व्यावसायिक दुकानांची निर्मिती,  व सध्या सुरु असलेल्या विविध योजना, नवीन प्रशासकीय इमारत, प्रधानमंत्री आवास योजना याबाबत मुख्य अभियंता महेश मेघवाळे यांनी सादरीकरणासह माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवस उपक्रमांतर्गत ज्येष्ठांना घरे, पारदर्शकतेसाठी ई आफिस सुविधेवर भर  आपण दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

- Advertisement -