मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जोरदार स्वागत
ठाणे, दि. ४ (जिमाका): मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तीस्थळाला भेट दिल्यानंतर दिली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आमदारांसमवेत रात्री सव्वा नऊच्या सुमारास आनंद नगर चेक नाक्यावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेत त्यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कोकण विभाग परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्य घटकांचा, शोषित,वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
००००