
- शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही
- लाडकी बहीण योजना सुरु राहणार
- शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी
- काळम्मावाडी धरणाची गळती थांबवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद
कोल्हापूर, दि.23 (जिमाका): राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करु, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटील, माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटील, माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर फॅक्टरीचे चेअरमन संजयबाबा घाटगे, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोजभाऊ फराकटे, विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले, बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, अविनाश जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकरी, महिला व सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, महिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी लाडकी बहिण योजना अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी दरवर्षी अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठीच्या योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु राहील, कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापुरातील समृद्ध शेती आणि ऊस क्षेत्र पाहता इथल्या शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीचा विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी या क्षेत्रात काही आवश्यक ते बदल, परवानग्या किंवा निर्णय घ्यावयाचे असतील तर आवर्जून सांगावेत, सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. सहकारी तत्त्वावर बँकेची उभारणी करुन विश्वनाथराव अण्णांनी सर्वसामान्य शेतकरी, छोट्या व्यावसायिकांना सक्षम करण्याचे काम केले आहे. या बँकेची वाटचाल वाखाण्याजोगी असून बँकेबरोबरच साखर कारखान्यांसाठीही त्यांनी योगदान दिले आहे. सहकाराच्या माध्यमातून या भागाची सामाजिक, आर्थिक व ग्राम विकासाची घडी त्यांनी बसवली आहे. या बँकेच्या वाटचालीत अनेक पिढ्यांनी योगदान दिल्याचा उल्लेख करुन शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्याबाबत बँकेने विचार करावा, असे आवाहन करुन बँकेच्या शतक महोत्सवासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जात- पात भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांनी दिलेली समतेची शिकवण आणि त्यांचे विचार अंगीकारुन आपण वाटचाल करणे गरजेचे आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवून ‘दहशतवादाचा नायनाट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ हा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्याचबरोबर सैन्यदलाची आणि भारतीयांची एकजूट यातून दिसून आली असून दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी यापुढेही अशी ऑपरेशन राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सहकार क्षेत्रात विश्वनाथराव पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. विश्वनाथराव पाटील बँकेने तब्बल 77 वर्ष पूर्ण केले असून या बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे.
प्रास्ताविकातून प्रविणसिंह पाटील यांनी बँकेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.
०००००