
मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे कार्यरत सहायक अधीक्षक सुमित हरिदास राठोड (वय ४५) यांचे शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी विरार येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. दिवंगत सुमित राठोड यांच्या पार्थिवावर यवतमाळ येथील मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवंगत राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुमित राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होते. २००८ मध्ये त्यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे लिपिक पदावर नियुक्ती झाली होती. गेल्या १८ वर्षांपासून ते महासंचालनालयात कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी विविध शाखांमध्ये जबाबदारीने व कुशलतेने कामकाज सांभाळले.
यावेळी संचालक (माहिती) (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे, उपसंचालक (प्रकाशने) सीमा रनाळकर, उपसंचालक (प्रशासन) डॉ. जगदीश मोरे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
दिवंगत राठोड यांच्या आकस्मिक निधनाने विभागाने एक कर्तव्यदक्ष सहकारी गमावला असून, त्यांच्या निधनाबद्दल माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
००००
संध्या गरवारे/विसंअ

WhatsApp