
सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या दिवाळी अग्रीम मदतीअंतर्गत सांगली जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ६०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर १०३ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्यात येत असून, या मदतीमुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या यंत्रणेमार्फत मदत वितरणाची कार्यवाही करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामातील अडचणी, पीक नुकसानीमुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती आणि सणासुदीचा खर्च यांचा सामना करताना या अग्रीम मदतीचा उपयोग होणार आहे.



याबाबत आटपाडी तालुक्यातील खरसुंडीचे अवधूत देशपांडे म्हणाले, महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना जो दुष्काळ निवारण निधी देण्यात येणार होता, तो निधी माझ्या अकाउंटमध्ये २ नोव्हेंबर रोजी जमा झालेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाचे मी याकरिता आभारी आहे. शेतकऱ्यांकरिता दीपावलीच्या आधी जो निधी देण्यात येणार होता, तो निधी महाराष्ट्र शासनाने अकाउंटमध्ये जमा केलेला आहे, तरी महाराष्ट्र शासनाचे मी आभारी आहे. तसेच आटपाडी तालुक्यातील महसूल विभागातर्फे वेळोवेळी शेतकऱ्यांकरिता प्राधान्य देऊन निधी जमा करण्यात आलेला आहे., त्यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.
मिरज तालुक्यातील सांगली येथील प्रदीप पाटील म्हणाले, खरीप हंगाम 2026 मध्ये सोयाबीनचे मी पीक घेतले होते. दुष्काळामुळे माझ्या उत्पन्नाला घट आली आणि त्या नुकसानीचे पंचनामे होऊन माझ्या बँक खात्यावर 5 हजार रुपये अग्रिम स्वरूपात जमा झाले आहेत. त्यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.
तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी येथील बाळकृष्ण बाबर म्हणाले, शेती पीकाचे नुकसानीचे पंचनामे शासनाने तात्काळ करून अग्रिम म्हणून ५ हजार रुपये माझ्या खात्यात जमा झाले आहेत. त्यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.
ज्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तांत्रिक अडचणी किंवा बँक खात्याच्या तपशिलातील त्रुटींमुळे मदतीची रक्कम जमा झालेली नाही, अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून, तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही अग्रीम मदतीचा लाभ मिळणार आहे.
०००००

WhatsApp