Home शहरे जळगाव साकेगावला जलद बसेसना थांबा द्या

साकेगावला जलद बसेसना थांबा द्या

भुसावळ, जि.जळगाव : शहरालगत असलेले व १५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या साकेगावातून सुमारे ५०० विद्यार्थी भुसावळ येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. जलद बस थांबत नसल्यामुळे तासन तास विद्यार्थ्यांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
साकेगाव येथून भुसावळला शिक्षणासाठी जाण्याकरिता सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांमध्ये पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी ये-जा करतात. शाळा उघडल्या असून, दिवसंदिवस विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी संख्येत वाढ होत आहे. सकाळी व दुपारी तासन्तास पावसाळ्यात उभे राहूनसुद्धा जलद बस थांबत नाही. यामुळे वेळेवर शाळेत व महाविद्यालयात पोहोचणे कठीण होते. उशिराने पोहोचल्यास दोन-तीन तासिका बुडतात. हे प्रकार नित्याचे झाले आहेत. महाविद्यालयातून उशिरा आल्याने दररोज तंबी दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता खचत असून इच्छा असूनसुद्धा बस वेळेवर येत नाही. जलद बस थांबत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांसह शेकडो चाकरमाने करतात दररोज ये-जा
साकेगाव येथून भुसावळ व जळगाव येथे विद्यार्थ्यांसह शेकडो चाकरमाने व व्यवसायिक दररोज ये-जा करतात. नेहमी स्थानकावर ये-जा करण्याची गर्दी असते. परंतु बसेस न थांबल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन कोलमडते. गावात वैद्यकीय महाविद्यालय, डी-फार्मसी, बी-फार्मसी महाविद्यालय तसेच गावालगतच गोदावरी एमबीबीएस कॉलेज व रुग्णालय आहे. यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांसह भुसावळ व जळगावहूनही बाहेरगावचे विद्यार्थी साकेगाव येथे दररोज ये-जा करतात. या विद्यार्थ्यांची ही महाविद्यालयात येण्यासाठी मोठी गैरसोय होते. बस वेळेवर येत नसल्यामुळे नाहक जास्तीचे भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तसेच खाजगी वाहनेही भरगच भरल्याने मालवाहू वाहने, ट्रॅक्टर, ट्रक अशा गाड्यांचा आधार विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता घेतात.
हात दाखवा बस थांबवा उपक्रम फक्त नावाला
नेहमी तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने मध्यंतरी प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा म्हणून हात दाखवा बस थांबा उपक्रम सुरू केले होते. चार दिवस फक्त दाखवण्यासाठी हा उपक्रम यशस्वी झाला. त्यानंतर वाहक व चालक यांच्या मनमानी कारभारामुळे हात दाखवूनसुद्धा बस थांबवली जात नाही. अशा उपक्रमांना कर्मचारीच प्रतिसाद देत नसतील तर एसटी महामंडळाला नफा तरी कसा मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होतो.
वाहकांचा मुजोरपणा
भुसावळ-जळगाववरून येणारी प्रवाशी घेऊन येणारी बस साकेगाव येथे प्रवाशांना उतरणारी एसटी गाडी एखादवेळेस थांबली व त्यांनी विद्यार्थी बसताना बघितले तर ते चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी अरेरावीची भाषा करतात. यामुळे विद्यार्थी मानसिक तणाव निर्माण होतो व त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी चालकांना विद्यार्थ्यांची सन्मानाने व प्रवाशांची नीट वागावे याबाबत तंबी देणे गरजेचे आहे.