
मुंबई, दि. 22 : मौजे येरखेडा जिल्हा नागपूर येथील कामठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील खसरा क्रमांक 122 मधील प्लॉट धारकांच्या सातबारा अभिलेखातील नोंदीबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यामुळे या प्लॉट धारकांना दिलासा मिळणार आहे.
कामठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील खसरा क्रमांक 122 मधील सातबारा अभिलेखातील महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद कमी करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर जमिनीचा ताबा प्लॉट धारकांकडे असून सातबारावर देखील त्यांची नावे आहेत. या अनुषंगाने प्लॉट धारकांच्या मागणीचा विचार करून बैठकीत निर्देश देण्यात आले.
कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्याधिकारी यांनी सद्यस्थितीची पूर्ण माहिती द्यावी. तहसीलदार यांनी याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवावा. या सर्व 36 प्लॉट धारकांच्या मागण्यांच्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावे, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते. तसेच नागपूरचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, कामठी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
00000
किरण वाघ/विसंअ/