सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत – महासंवाद

सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील – उद्योगमंत्री उदय सामंत – महासंवाद
- Advertisement -

एक्सपोर्ट पारितोषिक वितरण समारंभ साताऱ्यात होणार

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर जनता दरबार भरविणार

सातारा, दि. 4: सातारा जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. या ठिकाणी उद्योग व औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. सातारला आयटी पार्क व्हावा, अशी अनेक वर्षाची मागणी असून यासाठी सुचविण्यात आलेल्या जागा अत्यंत चांगल्या आहेत. साताराला निर्यातीची परंपरा मोठी असून ती अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. निर्यात पारितोषिक समारंभ सातारा येथे घेण्यात येईल यासाठी मासने समन्वयक म्हणून जबाबदारी घ्यावी. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विभागस्तरावर उद्योग विभागाचा जनता दरबार घेण्यात येईल. उद्योजकांचे प्रलंबित कामे, मागण्या, समस्या यांचा त्वरीत निपटारा करण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्या आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्याजकांशी संवाद मेळाव्याचे मास भवन येथील सर धनाजीशा कूपर सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी उद्योजकांशी संवाद साधला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योजक फारोखजी कूपर, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, मुख्य अभियंता नितीन वनखंडे, विभागीय अधिकारी डॉ. अमितकुमार सोडगे, कार्यकारी अभियंता लिराप्पा नाईक, उप अभियंता लहु कसबे ,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक उमेश दंडगव्हाळ, मासचे अध्यक्ष मानस मोहिते, धैर्यशील भोसले, बाळासाहेब खरात यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

सातारा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालय व्हावे, असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार सातारा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन होत आहे याचा आनंद होत आहे, असे सांगून उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले, या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन करत असतांनाच या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्पोरेट पद्धतीने कामे केली पाहिजेत. उद्योजकांची कामे या कार्यालयाद्वारे सुलभ व त्वरीत झाली पाहिजेत. म्हसवड येथील नव्याने होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये मोठं मोठे प्राजेक्ट येणार आहेत. यामध्ये डीफेन्स, फार्मा पार्क संबंधीत प्रोजेक्ट उभारण्याचे प्रयत्न केले जातील.  फिल्म इंड्रस्टीलाही उद्योगाचा दर्जा देण्यात येणार असून त्यातून चांगली रोजगार निर्मिती होईल, असेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

साताऱ्याला पर्यटन विकासाला अत्यंत मोठी संधी आहे, असे सांगून उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले, त्या दृष्टीने उद्योग उभारणीसाठी प्रयत्न व्हावेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेमध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांनी जिल्ह्याचे विशेष अभिनंदन केले. राज्यात गेल्या तीन वर्षात साडेबत्तीस हजाराहून अधिक उद्योजक निर्माण करण्यात आले आहेत. या वर्षात 23 हजार नव उद्योजक नव्याने निर्माण केले जात आहेत.  या माध्यमातून साधारणत: लाखाहून अधिक लोकांना रोजगार देण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. या योजनेबरोबरच जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी व लोकप्रतिनिधींनी विश्वकर्मा योजनेचा आढावा घेऊन या योजनेच्या अंमलबजावणीतही जिल्हा अग्रक्रमावर आणावा. या योजनेच्या माध्यमातून आपण असंख्य लघु उद्योजक निर्माण करु शकतो.

कूपर उद्योग समूहाचे सीएमडी फारोखजी कूपर यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे आभार माणून साताऱ्यातील उद्योजकांचा समस्यांचा निपटारा केला जाईल. उद्योग वाढीला चालणा देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाहीही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

सातारा जिल्ह्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालय अनेक वर्षाचे उद्योजकांचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.  सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय महामार्गाच्या रुपाने चांगली कनेक्टवीटी असतांनाही सातारा एमआयडीसीची वाढ झालेली नाही ही फार मोठी सहल आमच्या सर्वांच्या मनात आहे. सातारा एमआयडीसी वाढ अत्यंत महत्वाची असून वर्णे, निगडी व जाधववाडी येथील भूसंपादनाचे नोटेफिकेशन झालेले आहे. बागायती जमिन वगळून डोंगराकडची जमिन घेऊन एमआयडीसी वाढवावी. जिल्हाधिकारी यांच्या अधिकारामध्ये उपलब्ध असणारी जमिन यासाठी मिळविण्यात यावी व त्या ठिकाणी आयटी पार्क उभा करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी केली.

सातारा-पुणे हा प्रवास कालावधीत केवळ दोन तासांवर आला आहे. या मार्गावर दोन टनेलची कामे सुरु आहेत. ही टनेल कार्यान्वीत झाल्यानंतर हा कालावधी आणखीन कमी होईल. राष्ट्रीय महामार्गाची गरज सर्वात जास्त सातारावासियांना आहे. हा मार्ग आमची लाईफलाईन आहे या महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेसाठी आम्ही आग्रही आहोत. नागेवाडी लिंब खिंड येथील 46 हेक्टर जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात असल्याने एमआयडीसीकडे हस्तांतरीत व्हावी यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत.  साताऱ्याला वीज, पाणी मुबलक आहे उद्योगाचे पाणी उपलब्ध आहे उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण आहे. देशाबाहेरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात येण्यासाठी सकारात्मक असतात त्यामुळे उद्योग वाढीत सातारा मागे राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शासनाच्या सकारात्मक धोरणामुळे कूपर उद्योग समूह मोठा झालेला आहे. हा उद्योग समूह उत्पादित केलेला मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात करीत असून उद्योग समूहात स्थानिकांनाच रोजगार दिला जात असल्याचे उद्योजक श्री. कूपर यांनी सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालय साताराचे नूतनीकरण इमातीचे लोकार्पण
या कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालयाच्या नुतनीकरण इमातीचे लोकार्पण उद्योग मंत्री श्री. सावंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले.

 प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक

मास भवन येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बोलतांना उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी एमआयडीसी वाढीसाठी भूसंपादन करताना सर्व लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चा करावी. महसूल विभागाच्या अधिपत्याखालील जागा आयटी पार्कसाठी एमआयडीसीकडे मोफत हस्तांतरणाचा प्रस्ताव पाठवावा. ग्रामपंचायतीने एमआयडीसी परिसरातील दिवाबत्ती, पाणी रस्ते, स्वच्छता यांची कामे प्राधान्याने करावीत. माथाडी कायदा माथाडी कामगारांसाठी अत्यंत चांगला आहे. पण अमाथाडींचा उद्योजकांना कोणताही उपद्रव सहन केला जाणार नाही.  संबंधित यंत्रणेने आवश्यक ती दक्षता घ्यावी. उद्योगांना प्रात्साहन अनुदान देण्याच्या योजनेतील थकीत रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. नवीन औद्योगिक धोरण 15 दिवसात जाहीर करण्यात येईल. तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालयाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सावंत यांनी सांगितले.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, प्रांताधिकारी राहूल बारकुल, उज्वला गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

- Advertisement -