Home ताज्या बातम्या साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे काम महिनाभरानंतर सुरू

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे काम महिनाभरानंतर सुरू

0

सातारा :तब्बल महिनाभर रखडून पडलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला सोमवारपासून सुरवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने हे काम सुरू झाले असून हो काम करताना सोशल डिस्टन्सिंग व वैयक्तिक सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा शहराच्या वाहतुकीचा ताण सुलभपणे आपल्या पोटात सामावणारा 1280 मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर येत्या मार्चअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.

मात्र करोना संक्रमणाची व्याप्ती वाढल्याने 22 मार्चपासून राज्य शासनाने लॉक डाऊनचे आदेश जाहीर करून सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बांधकाम उपक्रम सक्तीने बंद ठेवले होते. राज्य शासनाने काही अटी- शर्तीवर उद्योग व बांधकाम क्षेत्रांना परवानगी दिल्यानंतर सातारा शहरात गेल्या सव्वा महिन्यापासून रखडलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला सोमवारपासून सुरवात झाली. कामाच्या पहिल्या दिवशी 40 कामगार कामावर हजर होते.

कोल्हापूर दिशेला असणाऱ्या ग्रेड सेपरेटरच्या वाढीव टप्प्यात खोदलेल्या भागाचे सपाटीकरण हाती घेण्यात येईल. मास्क, सॅनिटायझरच्या सुविधा कामगारांना पुरवणे व त्यांच्या सोशल डिस्टन्सिगवर कटाक्षाने लक्ष ठेवण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय कामगारांची वाहतूक, त्यांच्या निवासाची सोय आदी अटी- शर्तीचे पालन करणाऱ्या सर्वच बाबींच्या तपशीलाचे प्रतिज्ञापत्र महसूल विभागाला सादर करण्याच्या सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत.

पोवई नाका ते पेंढारकर हॉस्पिटल दरम्यानचा मार्ग 165 मीटरने वाढल्याने त्या कामाला डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन होते. ग्रेड सेपरेटरच्या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल वाहिन्यांचा अडथळा होता. प्राधिकरणाने युध्द पातळीवर यंत्रणा राबवून 15 मार्चपूर्वीच पेंढारकर हॉस्पिटल चौकातील जलवाहिन्या हटवल्या. त्यानंतर करोनाच्या संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन हे काम बंद ठेवण्यात आले होते. टप्पाटप्याने कामाला गती देऊन येत्या सप्टेंबरअखेर कोल्हापूर मार्गाची सेपरेटरची बाजू पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता आर. आर. आंबेकर यांनी दिली. विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आणि सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय असलेल्या ग्रेड सेपरेटरचे काम ऐंशी टक्के झाले आहे .

पोवई नाक्‍यावर 580 मीटरचा रस्त्यांचा स्लॅब, तर 120 ओपन टू स्काय’ स्लॅब पूर्ण झाला आहे. मात्र, ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होण्यासाठी सप्टेंबर2020 वाट पहावी लागणार आहे. मात्र पोवई नाका ते शाहू चौक व पोवई नाका ते हुतात्मा चौक हा रस्ता डांबरीकरणासह लवकरच खुले होणार असल्याचे संकेत प्रकल्प अभियंत्यांनी दिले आहे. शाहू चौक ते पोवई नाका रस्ता डांबरी झाला आहे . मात्र दुभाजकाची डावी बाजू बंद ठेऊन उजव्या बाजूने नाक्‍याकडे जाणारी वाहतूक सकाळच्या सत्रात नियंत्री तपणे सुरू आहे.