Home गुन्हा सात वर्षीय मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

सात वर्षीय मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

बदलापूरमध्ये घडली मन हेलावून टाकणारी घटना

हत्या-आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

बदलापुर | डी पी टी न्यूज | प्रतिनिधी- संतोष मक्षेत्रे

आईने आपल्या सात वर्षीय मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना बदलापुरात घडली आहे. या घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बदलापूरच्या कात्रप भागातील पनवेल हायवे परिसरात शुभंकरोती कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये मुंबई पोलीस दलात काम करणारे अशोक पाटील हे त्यांची आई, पत्नी मीनाताई आणि सात वर्षांची मुलगी कीर्तिकासह वास्तव्याला होते. बुधवारी रात्री पाटील हे ड्युटीवर गेले, त्यानंतर पाटील यांची आई बेडरूममध्ये, तर पत्नी आणि मुलगी हॉलमध्ये झोपले. रात्री उशिरा अचानक मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून सासू हॉलमध्ये आली असता अंधार असल्यानं काहीही दिसलं नाही. तोवर शेजारी सुद्धा दाराबाहेर जमले होते. शेजाऱ्यांनी घरात येऊन टॉर्च मारला असता पाटील यांची पत्नी मीनाताई आणि मुलगी कीर्तिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मीनाताई यांनी मुलीची धारदार शस्त्राने हत्या करत स्वत:च्याही गळ्यावर वार करून घेतले. यात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी पंचनामा करून या दोघींचेही मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी सासूच्या फिर्यादीवरून सुनेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून हा प्रकार नेमका कशामुळे घडला? याचा तपास सध्या सुरू आहे.