Home शहरे पुणे साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे – वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता त्रिंबके

साथीचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे – वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता त्रिंबके

0

पुणे: पूर ओसरला असला तरीही नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचे टाळावे, जेणेकरुन साथीचे आजार टाळता येतील, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता संतोष त्रिंबके यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय तपासणी सुरु आहे. या दवाखान्यात पुरग्रस्तांची तपासणी व सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या अनुषंगाने औषधांची कमतरता भासू नये, यासाठी महानगरपालिकेने दवाखान्यांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच पाण्यामुळे उद्भवणारे लेप्टोस्पायरोसिस, विषाणुजन्य आजार, अतिसार, उलटी-जुलाब, ताप, सर्दी, खोकला या आजारांवरील पुरेसा औषधसाठा देखील हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आला आहे. पुरग्रस्तांना तात्काळ औषधोपचार देण्यासाठी आपत्कालीन सुविधा कक्ष 24 तास सुरु ठेवण्यात आला आहे. पूर ओसरल्यानंतर पुरग्रस्त घरी परतल्यामुळे सध्या दैनंदिन वेळेबरोबरच सुट्टयांदिवशी महापालिकेचे सर्व दवाखाने सुरु ठेवण्यात आले असून नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असेही डॉ. लता त्रिंबके यांनी सांगितले.
निवारा कॅम्पमधील सुमारे 350 नागरिकांची तपासणी 4 ऑगस्ट पासून करण्यात आली आहे. निवारा केंद्रामधील पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय अधिकारी, नर्स व मदतनीस या वैद्यकीय पथकामार्फत पूरग्रस्तांची तपासणी करुन औषधोपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिलयाचेही डॉ. त्रिंबके यांनी सांगितले.

कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये गर्भवती स्त्रियांसाठी सुसज्ज अँब्युलन्स उपलब्ध आहे. गर्भवती महिलेला प्रस्तुती कळा सुरु झाल्यावर हॉस्पीटलमध्ये जाण्यास त्वरीत वाहन उपलब्ध न झाल्यास 020-25508500 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास ही व्हॅन तात्काळ मोफत मिळेल. तसेच या व्हॅन द्वारे संबंधित महिलेला इच्छित हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यात येईल. ही सेवा महानगरपालिकेतर्फे मोफत व 24 तास पुरविली जाईल.