डहाणू : पालघरमध्ये दोन साधूंसह एका वाहकाची हत्या केल्या प्रकरणी पोलीसांनी शंभरजणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय पालघरमध्ये वकीलांच्या बार असोसिएशनने घेतला आहे. त्यांनी केलेले कृत्य हे घृणास्पद आणि निंदनीय असून स्थानिक म्हणून वकीलांनी तशी भूमीका घेतल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणातील प्रमुख पाच आरोपी आणि त्यांना गुन्हा करण्यास साथ देणाऱ्या शंभर आरोपींना तूर्त वकील मिळणे कठीण आहे.
पालघरमध्ये चोर समजून तीन प्रवाशांची हत्या झाल्याची बातमी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली. मात्र, या प्रकाराचा व्हीडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी या प्रकरणावर देशभरातून प्रतिक्रीया उमटू लागल्या. पालघरमध्ये ज्या भागात हा प्रकार घडला तिथेही स्थानिकांनी या गोष्टीची निंदा केली आहे. विशेष म्हणजे तिथल्या स्थानिक वकीलांनी कुणीही या आरोपींचे वकीलपत्र घेणार नाही, त्यांचा खटला लढणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
पोलीसांनी या प्रकरणी प्रमुख पाच आणि अन्य शंभर जणांना या प्रकरणी अटक केली आहे. दरम्यान, या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. अद्याप तरी त्यांचे वकीलपत्र घेण्यासाठी कुणीही वकील तयार नाहीत. त्यामुळे आरोपींकडून वकील मिळवण्यासाठी पालघर किंवा डहाणू बाहेरील वकील मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. मात्र, त्यांनीही या आरोपींचे वकील पत्र घेऊ नये, असे मत इथल्या स्थानिकांनी व्यक्त केले आहे.






















WhatsApp