मुंबई, दि. ०१: सायबर सुरक्षेबाबत उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला, असे प्रतिपादन सी-डॅक (C-DAC) मुंबईचे वरिष्ठ संचालक डॉ. सी. पी. जॉन्सन यांनी केले. एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (AIAI) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “एमएसएमईंसाठी सायबर सुरक्षा बळकट करणे” या विषयावर ३१ जुलै रोजी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
वाढत्या सायबर धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि उद्योगांना डिजिटल सुरक्षितता मजबूत करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना उपलब्ध करून देणे हा या चर्चासत्राचा उद्देश होता.
चर्चासत्रात सहभागी मान्यवरांना संबोधताना डॉ. सी. पी. जॉन्सन म्हणाले, “केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या सी-डॅकला संशोधन व विकास क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळाचा वारसा आहे. उच्च कार्यक्षमता संगणन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डिजिटल गव्हर्नन्स, आरोग्यसेवा, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि शिक्षण अशा धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रांत सी-डॅकचे मोलाचे योगदान आहे. भक्कम सायबर परिसंस्था उभारण्यासाठी सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यात सातत्यपूर्ण जागरूकता, सज्जता आणि सहकार्य आवश्यक आहे.”

सी-डॅक मुंबईच्या सायबर सुरक्षा विभागाचे कार्यक्रम संचालक अमोल सुरोशे म्हणाले, “सायबर सुरक्षेकडे अतिरिक्त खर्च म्हणून न पाहता, व्यवसाय सातत्य, ग्राहकांचा विश्वास, महत्त्वाचा डेटा आणि संस्थेची प्रतिष्ठा जपणारी धोरणात्मक गुंतवणूक म्हणून पाहायला हवे. एमएसएमईंनी गव्हर्नन्स, जोखीम मूल्यांकन, मालमत्ता व्यवस्थापन, नियामक अनुपालन, तृतीय-पक्ष जोखीम व्यवस्थापन, सातत्यपूर्ण देखरेख आणि कर्मचारी जागरूकता यांचा समावेश असलेली रचना अवलंबली पाहिजे; कारण सायबर सुरक्षा ही एकवेळची प्रक्रिया नसून सातत्याने चालणारा प्रवास आहे.”
वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यावेळी म्हणाले, “एमएसएमई क्षेत्र भारताच्या जीडीपीमध्ये (GDP) जवळपास ३० टक्के आणि निर्यातीत सुमारे ४५ टक्के योगदान देते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या क्षेत्रातील उद्योगांनी कर्मचारी जागरूकता, भक्कम सायबर हायजिन, डेटा संरक्षण आणि उत्तम सुरक्षा पद्धतींचा अवलंब करून आपली सज्जता वाढवली पाहिजे.”
भक्कम सायबर सुरक्षा पद्धती अवलंबणाऱ्या उद्योगांना ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक मूल्य साखळीत सहजपणे सामील होणे शक्य होईल, असे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या व्यापार, गुंतवणूक व आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या संचालक श्रीमती प्रिया पानसरे यांनी सांगितले.
डिजिटल युगात सायबर सुरक्षा हा व्यवसाय जोखीम व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग बनला आहे, असे ग्लोबल असोसिएशन ऑफ इन्शुरटेक प्रोफेशनल्सचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. आफताब हसन यांनी नमूद केले.
या चर्चासत्रात उद्योजक, निर्यातदार, एमएसएमई प्रतिनिधी, उद्योग व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सायबर सुरक्षेसमोरील आव्हाने, नियामक घडामोडी, सायबर हायजिन पद्धती आणि संस्थात्मक सायबर स्थैर्य बळकट करण्याच्या व्यावहारिक उपाययोजनांबाबत तज्ज्ञांशी संवादात्मक चर्चा झाली. कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तर सत्राने झाला.
००००





















WhatsApp