
मुंबई, दि. २० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. मंत्रालयात पावसाळा पूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री भोसले बोलत होते.
राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन रस्ते काही प्रमाणात नादुरुस्त होतात असे यापूर्वी निदर्शनास आले असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, नागरिकाची गैरसोय होऊ नये या साठी खडेमुक्त रस्ते ठेवण्यासाठी विभागाने दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील तसेच खासगीकरणांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे वेळोवेळी भरून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. मुख्य अभियंता यांनी रस्त्यांवरील माहिती फलकांच्या व पादचारी पुलांची तपासणी करावी व खराब झालेल्या फलक आणि पादचारी पूल काढून टाकवेत. सर्वसाधारणपणे या माहिती फलकाचे संकल्पन वायुवेग १८० प्रतितास गृहीत धरुन तपासण्यात यावे. तसेच रस्त्यालगतचे जाहिरात व माहिती फलक तपासण्यात यावेत आणि खराब झालेले जाहिरात व माहिती फलक काढून टाकण्यात यावेत. सर्व घाट रस्त्यांची तपासणी करून ते खड्डेमुक्त तसेच सुरक्षित राहतील याची विशेष खबरदारी घेण्यात यावी. रस्त्यांवरील माहितीफलक वाचण्यायोग्य राहतील, तसेच रस्त्यावरील पट्टे मार्कीग्ज, ब्लिंकर्स वाहन चालकास दिसण्यायोग्य राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.
मंत्री भोसले म्हणाले की, घाट रस्त्यांची पाहणी करून सैल झालेले दगड काढून घ्यावे. ज्या ठिकाणी दरड कोसळून रस्ता बंद होऊ शकतो अशा ठिकाणी रस्ते वाहतुक सुरळीत करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच पर्यायी रस्तेही सुस्थितीत ठेवावेत. घाटातील धबधब्यावर पर्यटक थांबणार नाहीत याचे नियोजन करावे. त्यासाठी पोलिसांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी दिल्या.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे ) संजय दशपुत्रे, सहसचिव रोहिणी भालेकर, उपसचिव निरंजन तेलंग, संजय देगावकर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रादेशिक मुख्य अभियंते उपास्थित होते.
0000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/