सावर्डी वन क्षेत्रात साकारणार ऑक्सिजन पार्क पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी

सावर्डी वन क्षेत्रात साकारणार ऑक्सिजन पार्क पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी
- Advertisement -

अमरावती, दि. १६ : सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्मितीसाठी उद्यान रचना, वृक्षलागवड, आवश्यक निधी आदी सविस्तर सादरीकरण करावे व कामाला चालना द्यावी. हे काम गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. दर पंधरवड्याला कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

नांदगावपेठनजिक वन वाटिका वनक्षेत्र सावर्डी निसर्ग अभ्यासिका क्षेत्रात ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे. त्या जागेची पाहणी आज पालकमंत्र्यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वन क्षेत्र विकासाच्या अनुषंगाने १ कोटी रुपये निधी यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये आवश्यक वृक्षलागवड, सुविधा यांच्या अनुषंगाने परिपूर्ण नियोजन सादर करावे. ऑक्सिजन पार्कच्या रूपाने नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण करतानाच एक सुंदर उपवन उभे राहणार आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

येत्या पावसाळ्यात येथे आवश्यक वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने तयारी व्हावी. बहुविध वृक्षसंपदेने समृद्ध उपवन निर्माण होण्याच्या दृष्टीने वन विभाग प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी. दर पंधरवड्याला कामाचा आढावा घेतला जाईल, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.

 ०००

- Advertisement -