
कवी माधव हे एक निसर्गकवी होते. ते मूळचे कोकणातील असले, तरी त्यांचे बरेचसे आयुष्य आबकारी खात्यातील नोकरीमुळे मुंबईत गेले. असं असलं तरीही कोकणशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. यातूनच त्यांची हिरवे तळकोकण ही कविता त्यांना खरी ओळख करून देण्यास कारणीभूत ठरली. निसर्गाचे अप्रतिम वर्णन त्यांनी या कवितेत केले आहे. कवी माधव केशव काटदरे यांना जशी कोकणच्या निसर्गाची भुरळ पडली तद्वत कोकणातील अनेक लेखकांना आणि कवींना कोकणने लिहितं केलं. याचं श्रेय जसं लेखक आणि कवी यांच्या प्रतिभेला आहे तसं ते कोकणच्या सौंदर्याला देखील द्यावं लागेल. मुळात कोकणच्या ग्रामीण भागाला संगीत नाटकांचे भलतंच वेड होतं आणि ही परंपरा आजही जपली जातेय. या वेडापायी संगीत नाटकं लिहिणारे कलाकार देखील कोकणच्या या लाल मातीत जन्माला आले. एकापेक्षा एक उत्तम अशी संगीत नाटकं लिहून त्यांनी कोकणचं नाव अक्षरशः साता समुद्रापार पोहोचवलं. याबरोबरंच कोकणच्या व्यक्तिमत्वावर, गावांवर, चालिरितीवर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. कोकणची खोडसाळ आणि ईरसाल स्वभावाची व्यक्तिमत्व केवळ कोकणातीलच नव्हे, तर ज्यांचे कोकण जवळच्या नात्या प्रकारे ऋणानुबंध जुळले त्यांनी आपल्या लेखणीतूनही व्यक्तीमत्वे अजरामर केली. पु. ल . देशपांडे हे अशाच विनोदी लेखनशैलीतील एक अजरामर नांव. त्यांनी साकारलेला अंतूबर्वा पुढे रंगभूमीवर देखील आला. या व्यक्तिमत्वानी वाचकांच्या मनावर जसं अधिराज्य गाजवलं, तसंच ते प्रेक्षकांच्या मन:पटलावरही कायम राहिलं.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते वि. स. खांडेकर यांनी त्यांच्या साहित्यात आर्थिक विषमता, ध्येयवादी व्यक्तिंचे वैफल्य,दलितांवर होणारा अन्याय, दांभिकता दाखवून सामाजिक आशय आणला. ‘श्यामची आई’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांनी बालकुमारांसाठी कथा, कादंबरी, बालसाहित्य, कविता, निबंध, चरित्र, अनुवाद असे भरपूर लेखन केले. श्यामची आई या पुस्तकाच्या असंख्य आवृत्ती काढल्या गेल्या. आजही हे पुस्तक वाचणाऱ्याच्या नेत्रात पाणी तरळल्याशिवाय राहत नाही. मातृहृदयीमनाच्या साने गुरुजी यांचे लेखन हृदयस्पर्शी असल्याने वाचकांच्या मनावर ते आजही अधिराज्य गाजवत आहे. इतर लेखकांपैकी ‘बालसन्मित्र’ पाक्षिकाचे संपादक पा. ना. मिसाळ आणि गणेश बाळकृष्ण ताम्हाणे यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. पुढील काळात ग. त्र्यं.माडखोलकरांनी कादंबऱ्या, एकांकिका, समीक्षा, आणि लघुकथा लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्यातून सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा पुरस्कारआढळतो. जवळपास १२०० कथा आणि ५० कादंबऱ्या लिहिणारे शब्दप्रभू श्रीपाद काळे यांनी त्यांच्या साहित्यातून कोकणच्या निसर्गाचे आणि लोकजीवनाचे मार्मिक वर्णन केले. काळे यांच्या लेखणीतून कोकणचा निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो. १९५८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोकणी गं वस्ती’ या पहिल्या कथा संग्रहापासून आजवर सातत्याने लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी ‘माहिमची खाडी’ या कादंबरीद्वारे मुंबईतल्या झोपडपट्टीतील माणसांचे जीवन रेखाटले. त्यांच्या साहित्यात मानवी स्वभाव, मानवी जीवन आणि कोकणातील निसर्गाचे कुतूहल व्यक्त झाले. जैतापूर येथील अणुभट्टीवर त्यांनी लिहिलेले लाल बत्ती हे पुस्तक चांगलेच गाजले. कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून कर्णिक यांनी कोकणात लेखन आणि वाचन चळवळीला चांगलीच दिशा दिली. आज वयाची नव्वद वर्षे पार केल्यानंतरही मधु मंगेश कर्णिक यांची साहित्याविषयी असणारी ओढ आणि तळमळ नक्कीच अभिमानास्पद अशी आहे. दिल्ली येथील साहित्य संमेलनात प्रकाशित होणाऱ्या माझ्या “मंतरलेले दिवस” या पुस्तकाला भाईंनी स्वतःच्या हस्ताक्षरात प्रस्तावना लिहून दिली, ही बाब माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. करूळ या त्यांच्या गावात भाईंच्या पुढाकाराने सुरू झालेले मधु मंगेश कर्णिक ग्रंथालय आज कोकणची वाचन चळवळ पुढे नेण्यास हाभार लावतआहे.
साठोत्तरी काळातील साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर (आरती प्रभू) यांनी नाटक, कादंबरी व कथेच्या क्षेत्रातकोकणातील दंतकथा व गूढता यांचा प्रभावी उपयोगकेला. कोकणात आजही अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याबरोबरच अनेक गुढगोष्टी मोठ्या खुमासदारपणे आणि रंगवून सांगितल्या जातात. खानोलकर यांनी आपल्या लेखनात कोकणच्या या बारकाव्यांचा उत्तम आढावा घेतला. त्यांच्या साहित्यातून मानवी जीवनातील अतर्क्य आणि अद्भूत यांचा शोध घेण्यामुळे त्यांचे वेगळेपण जाणवते. मं. वि. कोल्हटकर, वि. कृ. नेरूरकर यांच्या साहित्यात कोकणातील अज्ञाताच्या भीतीचे चित्रण आहे. प्र. श्री. नेरूरकर यांनी कादंबरी, नाटक, बाल साहित्य, प्रवासवर्णन आणि चरित्रे साकारली आणि मालवणी बोलीतील साहित्यावर संशोधन केले. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले संसदपटू बॅ. नाथ पैं यांना मराठी कवीच्या काव्यपंक्ती मुखोद्गत असत. गं. बा. सरदार यांनी आपल्या ग्रंथांतून सामाजिक प्रबोधनाचे विचार मांडले. चंद्रकांत खोत यांचे कविता संग्रह, कादंबऱ्या ‘उभयान्वयी अव्यय’ आणि’बिंब-प्रतिबिंब’ प्रसिद्ध आहेत. त्यांचे बालसाहित्य मात्र काही कारणामुळे दुर्लक्षित राहिले. सतीश काळसेकर यांचा ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हा लेखसंग्रह आणि ‘इंद्रियोपनिषद’ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लोकप्रिय लेखक रत्नाकर मतकरी यांनी भयकथा, नाटकं, आणि बालनाट्ये अशी शेकडो पुस्तकं लिहिली आहेत.
जयवंत दळवी यांनी देखील कथा, कादंबऱ्या, नाटके या साहित्यप्रकारात ‘चक्र’, ‘महानंदा’, ‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’, ‘सूर्यास्त’ ‘पुरुष’, ‘सारे प्रवासी घडीचे’ अशी लोकप्रिय पुस्तके लिहिली.जयवंत दळवी हे दादरला भवानी शंकर रोडला विकास सोसायटीमध्ये राहत असत. याच ठिकाणी आमचे काका देखील राहत असल्याने बालपणी अनेकदा आमचे दादर येथे जाणे व्हायचे. दररोज सायंकाळी जयवंत दळवी एक फेरफटका मारण्यासाठी दादरच्या परिसरात फिरत असत. जाता येता आम्हाला त्यांचे दर्शन व्हायचे, मात्र ते त्यांच्याच विचारात मग्न असल्याचे दिसून येई. साहित्यातून महानगरीय माणसाचे दुःख मांडणाऱ्या ह. मो. मराठे यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ आणि ‘काळेशार पाणी’ या कादंबऱ्या गाजल्या. माधव कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या पुस्तकातून वाचकांना उपेक्षित जीवनविश्वाचा परिचय झाला.कोंडविलकर यांनी अखेरचाकाही काळ देवरुख येथे वास्तव्य केले होते.
आ. ना. पेडणेकर यांच्या लेखनात कोकणातील लोकजीवन आणि निसर्ग यांचे चित्रण आढळते. ‘शैलुक’, ‘मैत्र’, ‘वेडा’, इत्यादी कथासंग्रहातून सामाजिक आ. ना. पेडणेकर यांच्या लेखनात कोकणातील लोकजीवन आणि निसर्ग यांचे चित्रण आढळते. त्यांनी ‘शैलुक’, ‘मैत्र’, ‘वेडा’, इत्यादी कथासंग्रहातून सामाजिक विकृतींचा निषेध केला. श्री. ना. पेंडसे यांच्या लेखनातून प्रादेशिक जीवनासह मानवी जीवनाचे मर्म दिसते. त्यांच्या ‘एल्गार’, ‘हद्दपार’, ‘गारंबीचा बापू’ आणि ‘तुंबाडचे खोत’ या कादंबऱ्या आणि नाटके प्रसिद्ध आहेत. विद्याधर भागवत हे ‘आरती’ मासिकाच्या संपादनाबरोबरच कविता, कथा, कादंबरी, नभोनाट्य, बालसाहित्य, साहित्य समीक्षा आणि चरित्रलेखन करीत असत. त्यांना बालकवी ठोंबरे यांच्यावरील ‘ऐलतटावर -पैलतटावर’ कादंबरीसाठी पुरस्कार मिळाले. कोकणातील प्रख्यात लेखकांनी लिहिलेली नाटकं ज्यावेळी मुंबईतील नाटक कंपनीमार्फत कोकणच्या रंगमंचावर येत त्यावेळीही नाटकं पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग मोठी गर्दी करत असे.
डॉ. विद्याधर करंदीकर यांनी कवितासंग्रह, मालवणी एकांकिका तसेच केशवसुत आणि वीर सावरकर यांची चरित्रे लिहिली. करंदीकर पीएचडी करत असताना त्यांचे मार्गदर्शक असणाऱ्या, देवरुख येथील लेखक डॉ. सुरेश जोशी यांच्याकडे त्यांचे येणे व्हायचे. अनेकदा डॉक्टर करंदीकर यांची जोशी सरांच्या घरी भेट झाली. अत्यंत साधे असणारे हे व्यक्तिमत्व एका वेगळ्याच रसायनाने बनलेले असल्याची प्रत्येक भेटीत जाणीव व्हायची. मूळ बेळगावचे असणारे मात्र नोकरीनिमित्त देवरुख महाविद्यालयात प्राचार्य पदी विराजमान झालेले डॉ. सुरेश जोशी यांनी मधुभाई यांच्या खांद्याला खांदा लावून कोकण मराठी साहित्य परिषदेसाठी काम केले. जोशी यांची आजवर दहा पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे.प्रसिद्धीपासून दूर असणारे लुई फर्नांडिस यांच्या साध्या, सरळ शैलीतील कथांतून राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य, ध्येयनिष्ठ आणि धर्मनिरपेक्षता व्यक्त झालेली आहे. अनंत वासुदेव मराठे हे व्यासंगी लेखक आणि ‘किरात’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथाचे संपादन केले होते. प्रख्यात ललित लेखक रविंद्र पिंगे यांक २०० ललित लेख, ३०० व्यक्तिचित्रे आणि कथाकादंबऱ्या लिहिल्या वि.स.सुखटणकर यांच्या साहित्याची प्रेरणा मानवी स्वभाव आणि जीवनातील नाट्य ही होती. सिंधुदुर्ग साहित्य संघाचे सक्रिय कार्यकर्ते हरिहर आठलेकर हे वाड्मयीन कार्यकर्ता, आणि ललित लेखक म्हणून परिचित होते. शरद काळे यांचे ललित लेख, कथा व कविता सत्यकथा ‘आरती’ मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या. या काळात ज्या स्त्री लेखिका पुरुषांच्या बरोबरीने साहित्याच्या क्षेत्रांत सक्रिय होत्या, त्यातील ‘विभावरी शिरुरकर’ या टोपण नावाने लिहिणाऱ्या मालतीबाई बेडेकर पूर्वाश्रमीच्या कोकणातील होत्या. त्यांच्या ‘कळ्यांचे निःश्वास’ कथासंग्रहात स्त्रियांचा भावनिक व्यथांचे दर्शन घडते.
कोकणात अनेक नाटककार झाले. गडकऱ्यांच्या प्रभावाने ल. मो. बांदेकर यांनी ‘आर्य चाणक्य’, ‘सेकंड लिअर’ अशी नाटके लिहिली. मामा वरेरकर यांनी ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘करीन ती पूर्व’ इत्यादी ३७ नाटके लिहिली आणि त्यातून सामान्यांचे प्रश्न मांडले. मो. ग. रांगणेकर यांच्या ‘कुलवधु’ नाटकाला फार लोकप्रियता मिळाली. त्ति त्र्यं. खानोलकर यांच्या ‘एक शून्य बाजीराव, ‘अजब वर्तुळाचा’ या दर्जेदार नाटकांनी रंगभूमी गाजविली. कोकणच्या ग्रामीण भागात आजही संगीत नाटकांची परंपरा कायम आहे. विशेष म्हणजे कोकणातल्या लेखकांनी जी संगीत नाटके लिहिली आहेत, तीच नाटके, ग्रामीण रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्न हे कलाकार करत असतात. श्याम फडके यांनी एकांकिका, मुलांसाठी विनोदी नाटके आणि रसिकांसाठी नाट्यलेखन केले. श्री. ना. पेंडसे यांची महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’, ‘चक्रव्यूह’ ही नाटके लोकप्रिय झाली. ऐंशीच्या दशकात हौशी आणि व्यावसायिक नाटककार प्र. ल. मयेकर यांची रूपकात्मक नाटके नाट्यस्पर्धांमध्ये गाजली. लोकप्रिय नाटककार ला. कृ. आयरे यांनी आपली नाटके कामगार रंगभूमीवर सादर केली. आत्माराम सावंत यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी लेखन केले. याच काळात रमेश पवार, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, तुलसी बेहरे, गंगाराम गवाणकर, मधुसूदन कालेलकर इत्यादींची नाटके प्रसिद्ध होती. प्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या ‘लोककथा ७८’ आणि ‘आरण्यक’ या समांतर नाटकांना मानाचे स्थान मिळाले.मराठी नाटकाच्या इतिहासात कोकणातील हिराबाई पेडणेकर या पहिल्या मराठी स्त्री नाटककार होत्या. आत्माराम सावंत यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी लेखन केले. याच काळात रमेश पवार, वामन तावडे, डॉ. अनिल बांदिवडेकर, तुलसी बेहरे, गंगाराम गवाणकर, मधुसूदन कालेलकर इत्यादींची नाटके प्रसिद्ध होती.
जे. डी. पराडकर