Home शहरे जळगाव साहेबराव पाटील भाजपच्या वाटेवर

साहेबराव पाटील भाजपच्या वाटेवर

जळगाव :
सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. आज (दि. ३१) ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत वर्षा बंगल्यावर आपल्या समर्थकांसह अधिकृत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अमळनेरातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 

साहेबराव पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते राजकारणात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला असून, भाजपत प्रवेश केल्यानंतर ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. साहेबराव पाटील हे सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून ते दोन महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी पोलिस खात्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून राज्यभर सेवा बजावली आहे. 

अमळनेर मतदारसंघातून तयारी? 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते अमळनेर मतदारसंघातून इच्छुक आहेत. अमळनेर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, साहेबराव धोंडू पाटील, विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी बाहेरील जिल्हा आणि तालुक्यातून येऊन विजय मिळवल्याचा इतिहास आहे. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता आता सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराब पाटीलदेखील उमेदवारीच्या प्रयत्नात आहेत