मुंबई दि. १८ : सिंगापूर मध्ये आल्यानंतर भारतात आल्याची भावना होते, दोन देशात बरेच साम्य आहे, असे उद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. हॉटेल ट्रायडंट येथे सिंगापूरच्या ५७ व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंगापूरचे कौन्सुल जनरल चाँग मिंग फुंग, चाँग हाय वेई, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर – पाटणकर आणि विविध देशांचे कौन्सुल जनरल उपस्थित होते. दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सिंगापूरची आजपर्यंतची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता अशा अनेक क्षेत्रांत सिंगापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. सिंगापूरची प्रगती अनेक बाबतीत आदर्शवत आहे.
दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत, दिवसेंदिवस ते अधिक दृढ होत आहेत, ही आनंददायी बाब आहे. दोन्ही देशांचे हे शांतता आणि परस्पर सहकार्याचे पर्व वृद्धिंगत होत जावो अशा शुभेच्छा त्यांनी यानिमित्ताने दिल्या. भारत आणि सिंगापूरची अनेक साम्यस्थळे त्यांनी सांगितली. अनेक भारतीय सिंगापूरमध्ये अनेक वर्षांपासून व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यांना कधीही परकेपणा जाणवत नाही.
श्री चाँग मिंग फुंग म्हणाले, भारतासोबत द्विपक्षीय संबंध पूर्वीपासून मजबूत आहेत. उद्योग, शिक्षण, वाणिज्य, सेवा, सांस्कृतिक, पर्यटन, राजनैतिक संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावेत. अनेक भारतीय कंपन्या सिंगापूरमध्ये आहेत. या सर्वांमुळे दोन्ही देश प्रगतीची यशोशिखरे गाठत आहेत.
श्रीमती मनीषा म्हैसकर – पाटणकर म्हणाल्या, सिंगापूर आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. परस्पर सहकार्य दोन्ही देशांना प्रगतीपथावर नेण्यास मदत करतील.
0000
वृत्त: श्री. नारायणकर, उपसंपादक