‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास- संदीपान भूमरे – महासंवाद

‘सिट्रस इस्टेट’च्या माध्यमातून होणार शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास- संदीपान भूमरे – महासंवाद
- Advertisement -

औरंगाबाद, दि. 19 (जिमाका) :  पैठण तालुक्यातील इसारवाडी येथील ‘सिट्रस इस्टेट’ हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे. 40 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि जातिवंत रोपं तयार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून Center of Excellence अंतर्गत आणखी  12 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एक जागतिक दर्जाचे ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून हा प्रकल्प नावारुपास येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील आणि पर्यांयाने राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे म्हणाले.

इसारवाडी येथील तालुका फळरोपवाटीका आणि  ‘सिट्रस इस्टेट’ च्या विविध विकासकामांचे भुमिपूजन पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, कृषी सह संचालक दिनकर जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, प्रगतशील शेतकरी भगवान कापसे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, ‘सिट्रस इस्टेट’ उभारणीचा अभ्यास करण्यासाठी पंजाब येथील सिट्रस पार्कचा बारकाईने अभ्यास केला. इसारवाडीतील ‘सिट्रस इस्टेट’ मधून शेतकऱ्यांना मोसंबीचे दर्जेदार रोप तयार करुन देण्यात येईल. तसेच येथे मोसंबी या फळपिकावर संशोधन देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये प्रशिक्षण घेऊन मोसंबी लागवडीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर  मोसंबीची लागवड केली जाते.  हेक्टरी 8 टन एवढे मोसंबीचे  उत्पादन घेतले जाते पण हे उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

कृषी आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले की, या सिट्रस इस्टेटच्या उभारणीसाठी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे 40 कोटी रुपयांचा निधी  मिळाला आहे.  राज्यात 65 हजार हेक्टर मोसंबी क्षेत्र आहे. मोसंबीला आता राजाश्रय मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे वळले पाहिजे. ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये चांगले रोप बनविण्यात येतील. तसेच प्रशिक्षण देण्यात येत असल्याने  सर्वांनी प्रशिक्षण घ्यावे. Pepsi, Coco-Cola अशा शीतपेयांमध्ये मोसंबीचा रस टाकता येईल का याचा देखील राज्य सरकार विचार करत असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -