सिनेमागृहांसाठीचे नियम शिथील झाले नाहीत तर बॉलिवूड निर्माते घेणार ‘हा’ मोठा निर्णय

सिनेमागृहांसाठीचे नियम शिथील झाले नाहीत तर बॉलिवूड निर्माते  घेणार ‘हा’ मोठा निर्णय
- Advertisement -


हायलाइट्स:

  • मनोरंजनसृष्टीला प्रेक्षकांसाठी सिनेमागृहं कार्यान्वित करण्याचे वेध
  • मुंबईतील करोनाच्या परिस्थितीवर ‘मराठी सिनेमांचे’ भवितव्य.
  • दाक्षिणात्य सिनेमे देशभरात बहुतांश स्क्रीनमध्ये प्रदर्शित करण्यासाठी पूर्वतयारी सुरु.

मुंबईत सध्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहांसह मल्टिप्लेक्स बंद आहेत. परंतु, देशभरातील बहुतांश राज्यांनी खासकरून दक्षिणेतील राज्यांनी प्रेक्षकांसाठी अटी-शर्तींसह चित्रपटगृहं खुली केली आहेत. ‘बेल बॉटम’ या सिनेमाची जुलै महिन्यातील प्रदर्शन तारीख निश्चित झाल्यानंतर इतर सिनेनिर्मत्यांनीदेखील सिनेमागृह प्रदर्शनासाठी हालचाल सुरु केली आहे. परिणामी, मुंबईतील सिनेमागृहांसाठीचे निर्बंध शिथील न झालास; मुंबई वगळून सिनेमा प्रदर्शित करण्याचा विचारदेखील काही सिनेनिर्माते करत असल्याचं कळतंय.

ज्या बॉक्स ऑफिसवर दर शुक्रवारी सिनेमांची टक्कर व्हायची. एकाच तारखेला तीन-चार सिनेमे प्रदर्शित व्हायचे. तो सिनेमागृहाचा ‘बॉक्स ऑफिस’ आज रिकामा आहे. पण, येत्या महिन्यात पुन्हा एकदा मोठा पडदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होतोय. देशभरातील सिनेमागृहं पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत करण्यासाठी पूर्वतयारीला लागले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात येत्या महिन्यात सिनेमागृहं प्रेक्षकांसाठी कार्यान्वित झाले नाहीत; तर मुंबई वगळून उर्वरित देशात सिनेमे प्रदर्शित करण्याचा विचारदेखील सिनेनिर्माते करत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना लवकरात-लवकर मोठ्या पडद्यावर सिनेमे पाहायचे असतील तर त्यांना करोना प्रतिबंधात्मक नियमांचं आणि सवयींचं काटेकोर पालन करावं लागणार असल्याचं सांगितलं जातंय.

एकीकडे दाक्षिणात्य सिनेसृष्टी दमदारपणे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतेय. तर दुसरीकडे बॉलिवूडनेदेखील कंबर कसली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मोठा पडद्याला सिनेमांची झळाळी देण्यासाठी सिनेनिर्माते आणि सिनेमागृह व्यवस्थापक प्रयत्नशील आहेत. त्यातही आधी मल्टिप्लेक्स सुरु होतील; असं सिनेमा वितरक सांगतात. अक्षयकुमारचा ‘बेल बॉटम’, ‘सूर्यवंशी’, कंगना रणोटचा ‘थलैवी’, रणवीर सिंहचा ‘८३’, जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २‘ हे सिनेमे प्रामुख्याने नजीकच्या महिन्यांत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी‘, एस एस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हे सिनेमे दुसऱ्या टप्यात प्रेक्षकांच्या भेटीस येतील. देशात सिनेमा प्रदर्शनाचं चक्र सिनेमागृहात ऑगस्टच्या मध्यापर्यंत वेगाने फिरायला सुरु होईल; असं सिने-व्यापार विश्लेषक आणि सिने-निर्माते गिरीश जोहर सांगतात.

सणांच्या दिवसात ‘बॉक्स ऑफिस’ फुल्ल !
दसरा आणि दिवाळीच्या दिवसात सिनेमागृहात पुन्हा हाऊसफुल्लची पाटी लागेल; अशी आशा सिनेसृष्टीला आहे. या दिवसात प्रदर्शनासाठी प्रतीक्षेत असलेले छोट्या-मोठ्या बजेटचे असे सर्व सिनेमे सिनेमागृहांत येतील.

सिंगल स्क्रीन अडचणीत
मार्च २०२० पासून आजतागायत मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व सिंगल स्क्रीन चित्रपटगृह बंदच आहेत. मध्यंतरीच्या महिन्यांमध्ये ५० टक्के क्षमतेत सिनेमागृहांना कार्यान्वित होण्याची परवानगी राज्य आणि केंद्र सरकारने दिली होती. तेव्हादेखील आर्थिक अडचणींमुळे सिंगल स्क्रीन चित्रपटगृहं प्रेक्षकांसाठी खुली झाली नव्हती. आता येत्या महिन्यात ५० टक्के क्षमतेत सिनेमागृह कार्यान्वित करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाली तरीदेखील ती सुरु होणार नाहीत. १०० टक्के क्षमतेत कार्यान्वित होण्याची परवानगी मिळेपर्यंत प्रेक्षकांना सिंगल स्क्रीनमध्ये जाण्याची प्रतीक्षा करावी लागेल.

मराठी सिनेमे आणि महाराष्ट्र
मुबंईत चित्रपटगृहं पूर्ण क्षमतेने सुरु होत नाहीत तोपर्यंत मराठी सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी सिनेनिर्माते उत्सुक नसल्याचं दिसतंय. महाराष्ट्रातील मराठी सिनेमांचा बहुतांश व्यवसाय मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरातून होतो. त्यामुळे जोवर मुंबईतील चित्रपटगृहांची दारं उघडत नाहीत तोवर शेकडो मराठी सिनेमांवरील पडदा कायम राहणार आहे.



Source link

- Advertisement -