सिल्लोड, सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी

सिल्लोड, सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी
- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका) :- गेल्या दोन तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले. त्यापार्श्वभूमिवर आज अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी  सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील विविध गाव शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेताच्या बांधावर जाऊन आढावा घेतला व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

श्री. सत्तार म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच शासन निर्णय घेईल. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कालच झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एमडीआरएफच्या नियमाप्रमाणे तसेच २ हेक्टर  ऐवजी ३ हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

या पाहणी दौऱ्यात तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जन पा. गाढे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, सयाजी वाघ तसेच उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार रमेश जसवंत, नायब तहसिलदार प्रभाकर गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार सोनवणे, जि.प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी शाखावार, जि.प. पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब माळी, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे, शाखा अभियंता एकनाथ शेळके, पं. स. विस्तार अधिकारी पी. बी. दौड आदिंसह महसूल, कृषी व विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी ,गावकरी उपस्थित होते. श्री. सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील बनकिंन्होळा , केऱ्हाळा, चिंचखेडा, पालोद, गोळेगाव, उंडनगाव, अंभई, धावडा , चारणेर वाडी ,घाटनांद्रा तसेच सोयगाव तालुक्यातील जरंडी, जंगला तांडा आदी गाव शिवारातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

०००००

- Advertisement -