Home गुन्हा सीकर:अंगणात झोपलेल्या तरुणीला पेट्रोल टाकून जाळले

सीकर:अंगणात झोपलेल्या तरुणीला पेट्रोल टाकून जाळले

सीकर: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचं दिसत आहे.राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात एका तरुणीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी तरुणाने विष प्राशन केले. आरोपी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीकर जिल्ह्यातील पाटण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली आहे. प्रेम प्रसंगातून तरुणाने हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

अंगणात झोपली होती तरुणी

पाटणचे पोलीस अधिकारी नरेंद्र भढाना यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गुरुवारी रात्री २३ वर्षीय पीडित तरुणी आपल्या परिवारासोबत अंगणात झोपली होती. यावेळी आरोपी राकेश हा छतावरुन अंगणात आला आणि त्याने मुलीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

पीडित तरुणीचा मृत्यू

पोलीस अधिकारी नरेंद्र भढाना यांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी आग विझवली आणि त्यानंतर तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नीमकाथाना येथील सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. यानंतर डॉक्टरांनी तिला जयपूर येथे उपचारासाठी हलविण्यास सांगितले. शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

आरोपीने केलं विष प्राशन

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीला पेटवून आरोपी राकेश याने विष प्राशन केले. त्याची तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी चौमू येथील रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी राकेशच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. प्राथमिकदृष्ट्या प्रेम प्रकरणातून आरोपीने हे कृत्य केल्याचं दिसत असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बलात्कार

उत्तरप्रदेशातील नोएडा येथे एका अल्पवयीन मुलीला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकून बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ शूट केला होता आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वर्षभर बलात्कार करत होते.