Home ताज्या बातम्या सीबीडी बेलापूर येथील बहुउद्देशीय इमारतीस माजी नगरसेविका कै. शकुंतला महाजन यांचे नामकरण

सीबीडी बेलापूर येथील बहुउद्देशीय इमारतीस माजी नगरसेविका कै. शकुंतला महाजन यांचे नामकरण

 महिलांच्या विकासाची तळमळ घेऊन काम करणा-या व संवेदनशील कवीमन जपणा-या कै. शकुंतला महाजन यांच्या सेवाभावी कार्याचे स्मरण कायम रहावे यादृष्टीने सीबीडी बेलापूर येथील बहुउद्देशीय इमारतीस त्यांचे नामकरण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी एकेकाळी सहकारी नगरसेविका असलेल्या महाजन मॅडम यांनी महिला बालकल्याण समितीचे अध्यक्षपद भूषविताना महिलांसाठी इतर महानगरपालिकांमध्ये देत अललेल्या सुविधांचा अभ्यास करून त्यातील लाभदायक योजना अंगिकारण्यासाठी पुढाकार घेतला होता तसेच समाजाच्या हितासाठी झटून काम केले होते अशा शब्दात त्यांच्या मितभाषी मात्र कार्यप्रणव शैलीचे कौतुक केले.  

      याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, प्रस्ताव सूचक नगरसेवक श्री. अशोक गुरखे, स्थानिक नगरसेविका श्रीम. सुरेखा नरबागे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, श्रीम. अनिता मानवतकर, माजी नगरसेवक श्री. निवृत्ती कापडणे, कार्यकारी अभियंता श्री. शंकर पवार, विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, उपअभियंता श्री. पंढरीनाथ चौडे आणि श्री. भिमराव महाजन व कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी माजी नगरसेविका कै. शकुंतला महाजन यांच्या सोबतच्या मैत्रीपूर्ण आठवणींना उजाळा देत सामान्यातल्या सामान्य माणसांचा विचार करून सेवाभावी काम करणा-या त्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्या होत्या अशा शब्दात विशेष उल्लेख केला. खानदेशकन्या असल्याचा अभिमान बाळगत बहिणाबाई चौधरींचा काव्यवारसा कै. महाजन मॅडम यांनी आपुलकीने जपल्याचेही त्यांनी सांगितले.

      नगरसेवक श्री. अशोक गुरखे यांनी आपल्या पूर्वीच्या सहकारी असणा-या कै. शकुंतला महाजन यांच्या नामकरणातून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्याची मनोभूमिका विषद केली. कै. शकुंतला महाजन यांच्या सुकन्या तथा महानगरपालिकेच्या सानपाडा माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. शोभा कुदळे यांनी मनमोगरा या महाजन यांच्या काव्यसंग्रहातील एक कविता सादर करून आईला आदरांजली अर्पित केली.