Home बातम्या महत्वाच्या बातम्या सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

0

वडखळ : दिवाळीची सुट्टी व भाऊबीज असल्याने मुंबईसह उपनगरातील इतर राज्यातील अनेक चाकरमानी, पर्यटकांनी अलिबाग, मुरुड, कोकणात तसेच महाबळेश्वर, पाचगणी, वाईच्या दिशेने धाव घेतली. खासगी गाड्यांनी हे चाकरमानी, पर्यटक निघाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरवाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे चाकरमानी, पर्यटकांचे प्रचंड हाल झाले.

दिवाळी आणि सुटी यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली वाहने, वाहनचालकांचा बेदरकारपणा, पुढे वाहने काढण्याच्या प्रयत्नात रस्ता अडवणे, त्यातच रस्त्यावर बंद पडलेली वाहने, यामुळे गडब- वडखळ ते पेण – अंतोरा या ठिकाणांहून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आले. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबल्याने एकतर्फी महामार्गावरून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे बनले होते. अनेक ठिकाणी छोटी वाहने पुढे काढण्याच्या नादात वाहतूक कोंडीत भर पडत होती.
वाहतूक पोलिसांची यंत्रणा रस्त्यावर असली तरी नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडी दूर करणे त्यांना त्रासदायकच होत होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.

पर्यटकांची अलिबाग, मुरुडला पसंती
पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओढा अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन, मुरुड या समुद्रकिनारपट्टीकडे असल्याने, तेथे जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली होती. दैनंदिन प्रवास करणारी एसटीची सेवा, अवजड माल वाहू वाहने यांची भरीस भर पडली आहे.मात्र ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी वाहन चालक, प्रवाशांकडून होत आहे.