
नवी दिल्ली, दि. 16 : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करते. वर्ष 2024 साठी विविध श्रेणींमधील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विविध श्रेणींमध्ये 35 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महिला उद्योजक, अनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक तसेच ईशान्येकडील राज्यांमधील ‘एमएसएमई’ उद्योजकांना विशेष तरतुदीद्वारे पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत, पुरस्कारप्राप्त ‘एमएसएमईं’ना 3 लाख रुपये (प्रथम पुरस्कार), 2 लाख रुपये (द्वितीय पुरस्कार) आणि 1 लाख रुपये (तृतीय पुरस्कार) पुरस्कार रक्कम स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.
राष्ट्रीय पुरस्कार 2024 च्या विविध श्रेणीसाठी ‘एमएसएमई’कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. 20 मे 2025 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे (https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspx) हे अर्ज सादर केले जाऊ शकतात. इच्छुक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारेदेखील (https://awards.gov.in/) त्यांचे अर्ज सादर करू शकतात. याबाबतचा तपशील www.dcmsme.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जकर्ते यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या एमएसएमई – विकास आणि सुविधा कार्यालय (MSME – DFO) किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23063342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.