मुंबई, दि.२९ : देशाची आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मितीमध्ये ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ (एमएसएमई) अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. या उद्योगांना सक्षम करून भारताची जागतिक स्तरावरील निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित ‘निर्यात वाढवणे, आणि एमएसएमई सक्षम करणे’ या विषयावरील विशेष सत्रात तज्ज्ञांनी केले.
या कार्यक्रमात परकीय व्यापार महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक राजेशकुमार मिश्रा, एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बंगारी आणि एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.
‘डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब’ मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती – राजेशकुमार मिश्रा
परकीय व्यापार महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक राजेशकुमार मिश्रा यांनी सरकारच्या ‘डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेची आता पूर्ण अंमलबजावणी होत आहे. याद्वारे देशाच्या ग्रामीण आणि अंतर्गत भागातील लघु व मोठ्या उत्पादकांना जागतिक बाजारपेठेशी जोडले जात आहे. महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, रायगड, जळगाव आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये जिल्हा न्याय निर्यात आराखड्यांवर काम सुरू आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, नवीन ‘निर्यात प्रोत्साहन मिशन’ अंतर्गत एमएसएमई क्षेत्राला नॉन-फायनान्शियल ट्रेड बॅरियर्स पार करण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे. तसेच ई-कॉमर्सच्या माध्यमातून लहान प्रमाणावर निर्यात करणाऱ्या उत्पादकांसाठी क्रेडिट गॅरंटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एमएसएमई क्षेत्रासाठी एक्झिम बँकेचे विशेष योगदान – हर्षा बंगारी
एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बंगारी यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “भारताच्या एकूण निर्यातीमध्ये एमएसएमई क्षेत्राचा वाटा जवळपास ५०% आहे. या उद्योगांना तांत्रिक आणि आर्थिक साहाय्य देण्यासाठी एक्झिम बँकेने ‘उभरते सितारे’ कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याद्वारे डीप-टेक आणि हाय-टेक क्षेत्रातील संरक्षण व वैद्यकीय उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना मदत केली जात आहे.”
तसेच, एमएसएमईंना खेळत्या भांडवलाची अडचण येऊ नये म्हणून गिफ्ट सिटीमध्ये फॅक्टरींग सेवा सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे तारण नसतानाही इनव्हॉइसवर कर्ज मिळणे सोपे झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
लहान उद्योगांना वेळेत कर्जपुरवठा करणे आवश्यक – डॉ. विजय कलंत्री
वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री यांनी लहान उद्योगांच्या बँकिंग समस्यांवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचा वाटा एक तृतीयांश इतका मोठा आहे. परंतु, तळागाळातील उद्योजकांना वेळेत आणि सुलभतेने कर्जपुरवठा मिळणे आवश्यक आहे. बँकांनी डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून कर्ज मंजुरीची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक करावी.”
जागतिक स्तरावर अमेरिका आणि युरोपमधील भू-राजकीय तणावामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा उल्लेख करत त्यांनी भारतीय निर्यातदारांना लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण आशिया यांसारख्या नव्या बाजारपेठांचा शोध घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार आणि एमएसएमई क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक्झिम बँक आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
0000
संजय ओरके/विसंअ



















WhatsApp