Home ताज्या बातम्या सॅनिटरी नॅपकीन, डायपरची स्वतंत्र विल्हेवाट

सॅनिटरी नॅपकीन, डायपरची स्वतंत्र विल्हेवाट

0
सॅनिटरी नॅपकीन, डायपरची स्वतंत्र विल्हेवाट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

सॅनिटरी नॅपकीन आणि डायपर हे सर्रास ओल्या आणि सुक्या कचऱ्यात टाकले जातात. ते हाताळताना सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्‍न असतो. तसेच या कचऱ्याचे विघटन होण्यास प्लास्टिकप्रमाणे वेळ लागतो. त्यामुळे महापालिकेने या कचऱ्याचे संकलन आणि विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अंधेरी, धारावी, मालाड येथे उच्च क्षमतेच्या भट्ट्या (प्लाज्मा मेथड) उभारण्यात आल्या आहेत. जूनपासून हा प्रकल्प संपूर्ण मुंबईत सुरू करण्यात आला आहे.

मुंबईत दररोज लाखोंच्या संख्येने सॅनिटरी नॅपकीन आणि डायपरचा वापर होत असून हा कचरा दैनंदिन कचऱ्यात टाकला जातो. कचरा संकलन करणारे ते डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी हे घातक ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६नुसार सॅनिटरी नॅपकीन आणि डायपरच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने ही यंत्रणा उभारली असून या कचऱ्याची ‘घातक कचराट अशी स्वतंत्र वर्गवारी केली आहे.

मुंबईच्या विविध भागांतून गोळा केला जाणारा सर्व प्रकारचा कचरा विभागीय कचरा विलगीकरण केंद्रात एकत्र केला जातो. शहर आणि उपनगरात अशी ३४ केंद्र आहेत. तेथे हा घातक कचरा इतर कचऱ्यातून वेगळा केला जातो. या केंद्रात पालिकेचे इलेक्ट्रिक वाहन येऊन तो कचरा गोळा करते. सात परिमंडळामध्ये सात दिवस दररोज एक दिवस ही गाडी जाते. या गाडीमार्फत धारावी, अंधेरी आणि मालाड येथील भट्ट्यांमध्ये विल्हेवाटीसाठी कचरा पाठवला जातो. या भट्ट्यांची सुमारे चार मेट्रिक टन कचरा विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन (वाहतूक) विभागाचे कार्यकारी अभियंता परशुराम कुऱ्हाडे यांनी दिली.

सध्या मुंबईच्या विविध भागांतून दररोज ३०० ते ३५० किलो घातक कचरा जमा होतो. येत्या काळात २४ विभागांत २४ इलेक्ट्रिक वाहने कचरा संकलनासाठी पाठवली जाणार आहेत. नागरिकांनी घरात ओला, सुका आणि घातक अशा तीन प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करावे. तो कचरा पालिकेच्या कचरा गाडीत द्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

लोखंडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वतंत्र द्या

लोखंडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, बल्ब, ट्यूबलाइट, सेल हाही घातक कचऱ्याचा प्रकार असून, त्यामुळे लहान स्वरूपाचे स्फोट होण्याची शक्यता असते. तसेच या वस्तू हाताळताना सफाई कामगारांना इजा होण्याची भीती असते. घरगुती रसायने यात कीटकनाशके, औषधे वैद्यकीय साहित्य, रंगाचे डबे यांचा समावेश आहे. हा कचरा सुक्या कचऱ्यात टाकला जातो. तोदेखील स्वतंत्र दिल्यास विल्हेवाटीसाठी उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.

मुंबईतील कचऱ्याचा तपशील

दररोजचा कचरा : सहा हजार २०० मेट्रिक टन

ओला कचरा : सुमारे चार हजार मेट्रिक टन

सुका कचरा : सुमारे एक हजार २०० मेट्रिक टन

घरगुती घातक कचरा : ७० ते ८० मेट्रिक टन

Source link