Home ताज्या बातम्या सेक्स राफ्ट : 11 जणांना एका बोटीवर 101 दिवस कैद करून करण्यात आलेला विचित्र प्रयोग

सेक्स राफ्ट : 11 जणांना एका बोटीवर 101 दिवस कैद करून करण्यात आलेला विचित्र प्रयोग

हिंसा आणि सेक्स यावर 1973 साली एक प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगात 11 जणांना तीन महिन्यांसाठी समुद्रात तरंगणाऱ्या एका राफ्टवर (एक प्रकारची बोट) ठेवण्यात आलं.

कठीण परिस्थितीत ते उग्र होतात का, त्यांच्यात हिंसेची भावना जागृत होते का, हे तपासणं, हा या प्रयोगाचा उद्देश होता.

त्याकाळचे जगातले अग्रगण्य शास्त्रज्ञ आणि बायोलॉजिकल अॅन्थ्रोपोलॉजी तज्ज्ञ सँटियागो जिनोव्ज यांना 1972 साली झालेल्या एका विमान अपहरणातून हा प्रयोग सुचला. त्या विमानात ते स्वतःदेखील होते.

ते विमान मांटिरोहून मेक्सिकोसाठी रवाना झालं होतं. पाच सशस्त्र लोकांनी हे विमान हायजॅक केलं आणि कथित राजकीय कैद्यांना सोडून विमानाची सुखरूप सुटका करण्यात आली होती.

या विमानात असलेले जिनोव्ज हिंसेच्या इतिहासावर आयोजित एका संमेलनातून परतत होते. त्यांच्यासोबत त्या विमानात 103 प्रवासी होते.

प्रयोगाचा विचार कसा आला?

जिनोव्ज यांनी लिहिलं आहे, “हिंसात्मक वागणुकीवर आयुष्यभर अभ्यास करणारा मीही याच विमान अपहरणात अडकलो होतो. लोक का भांडतात आणि त्यांच्या मेंदूत काय सुरू असतं हे जाणून घ्यायचा विचार माझ्या मनात सतत सुरू असायचा.”

विमान अपहरणाच्या या घटनेने त्यांना मानवी स्वभावाचा अभ्यास करण्याची एक नवी कल्पना सुचवली. नॉर्वेचे एक मानववंशशास्त्रज्ञ (अँन्थ्रोपॉलॉजिस्ट) थोर हायेरडाल यांच्या एका प्रयोगातूनही जिनोव्ज यांनी माहिती मिळाली.

खरं म्हणजे या दोघांनीही तंतोतंत जुन्या इजिप्शियन नावेसारख्या दिसणाऱ्या एका नावेवरून 1969 आणि 1970 दरम्यान प्रवास केला होता. आफ्रिकन लोक कोलंबसच्या आधी अमेरिकेला पोहोचू शकत होते, हे सिद्ध करणं, हा त्या प्रयोगाचा उद्देश होता.

याच दरम्यान जिनोव्ज यांच्या डोक्यात विचार चमकला की समुद्राच्या लाटेवर असणारा एखादा गट मानवी व्यवहाराच्या अभ्यासासाठी एका प्रयोगशाळेसारखा उपयोगी ठरू शकतो.

पाण्यावरचं घर

हा प्रयोग विशेषतः तणाव वाढवण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला होता.

मेक्सिको नॅशनल विद्यापीठाच्या एका पाक्षिकात त्यांनी 1974 साली लिहिलं, “प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगावरून सिद्ध होतं की एका मर्यादित जागेत अनेक प्रकारच्या उंदरांना ठेवलं जातं तेव्हा ते आक्रमक होतात. हेच मानवाच्या बाबतीतही घडतं का, हे मला जाणून घ्यायचं होतं.”

यासाठी जिनोव्ज यांनी 12X7 मीटरची एक राफ्ट तयार केली. त्यात 4X3X7 मीटरची एक केबीन होती. त्यात केवळ झोपता येणं शक्य होतं.

टॉयलेट बाहेर होतं. या राफ्टचं नाव होतं एकैली. मॅक्सिकोमध्ये याचा अर्थ होतो ‘पाण्यावरचं घर’.

या राफ्टवर 11 जण होते. यात स्वतः जिनोव्ज यांचाही समावेश होता. ही राफ्ट कॅनरी बेटापासून मेक्सिकोच्या प्रवासाला निघाली. या राफ्टमध्ये इंजिन नव्हतं. वीज नव्हती आणि मदतीसाठी दुसरी बोटही नव्हती.

या प्रयोगात लोकांना सामील करण्यासाठी जिनोव्ज यांनी जगभरात जाहिरात दिली. शेकडो लोकांनी त्यासाठी अर्ज केला. मात्र, त्यापैकी केवळ 10 जणांची निवड करण्यात आली. यात 6 महिला आणि 4 पुरूष होते.

या सर्वांची नागरिकत्व, धर्म आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर निवड करण्यात आली. यामध्ये केवळ चौघे अविवाहित होते. त्यांची निवड या गटात तणाव निर्माण करण्यासाठी करण्यात आली होती.

स्वीडनची एक 30 वर्षांची स्त्री मारिया जोर्नस्टम हिला बोटीची कॅप्टन बनवण्यात आलं आणि सर्व प्रमुख कामं स्त्रियांकडे सोपवण्यात आली. पुरूषांना कमी महत्त्वाची कामं देण्यात आली.

जिनोव्ज यांनी लिहिलं, “स्त्रियांकडे अधिकार दिले तर हिंसेची थोडीफार शक्यता निर्माण होईल, असं मी स्वतःला विचारलं होतं”

एकैली राफ्टने 13 मे 1973 रोजी प्रवास सुरू केला आणि ती मेक्सिकोच्या कोजुमेल बेटाकडे रवाना झाली.

सेक्स राफ्टच्या अफवा

आजच्या रिअॅलिटी शोज प्रमाणे त्याकाळी एकैलीवर अत्याधुनिक तांत्रिक उपकरणं नव्हती. तरीदेखील मीडियामध्ये अंदाज आणि अफवांचं पेव फुटलं. मीडियामध्ये ‘लव्ह राफ्टवर सेक्स’ या मथळ्याखाली बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांशी राफ्टवरच्या सदस्यांचा अजिबात संपर्क नव्हता. त्यामुळे लवकरच एकैलीची ‘सेक्स राफ्ट’ अशी ओळख निर्माण झाली. मात्र, या राफ्टवरची परिस्थिती वेगळीच होती.

आपल्या लेखात जिनोव्ज सांगतात, “शास्त्रीय अभ्यासांवरून सेक्स आणि हिंसा यात संबंध असल्याचं दिसतं. यात सेक्सविषयीचा बहुतांश आंतरविरोध स्त्री आणि पुरूष यांच्यात निर्माण होतो. याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही सेक्शुअली आकर्षक अशा वस्तू निवडल्या आणि सेक्सचा संबंध अपराधीपणाशी जोडला असल्याने मी अंगोलाहून एका रोमन कॅथलिक पादरी बर्नांडो यांचीही निवड केली होती.”

मात्र, या प्रयोगातून जिनोव्ज यांची निराशा झाली होती. कारण अनेक सदस्यांमध्ये शरीरसंबंध स्थापन होऊनही कुठल्याच प्रकारचा ताण किंवा आक्रमकता दिसली नाही.

मात्र, जिनोव्ज यांच्या या प्रयोगाचा आणखी एक मोठा उद्देश होता. जिनोव्ज यांनी राफ्टच्या कॅप्टनला सांगितलं होतं की ‘पृथ्वीवर शांतता कशी प्रस्थापित केली जाऊ शकते, हे शोधून काढणं, हा या प्रयोगाचा उद्देश आहे.’ मात्र, आक्रमकता आणि ताणाविषयीच्या जिनोव्ज यांच्या आशा धुळीला मिळत होत्या. केवळ शार्क बघितल्यावरच बोटीवरच्या या सदस्यांमध्ये तणाव निर्माण व्हायचा.

प्रयोगच्या 51 दिवसांनंतर जिनोव्ज निराश झाले. ते लिहितात, “आपण युद्धाशिवाय जगू शकतो का?, या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधू शकत नव्हतो.”

त्यांच्या या पद्धतीने आक्रमकता निर्माणच होत नाही, असं त्यांना जाणवू लागलं.

परिस्थिती कधी बिघडली?

इतर सदस्यांच्या तुलनेत जिनोव्ज यांच्यात नकारात्मकता अधिक होती. एकैलीवरच्या काही सदस्यांनी कबूल केलं की जवळपास 50 दिवसांनंतर त्यांच्या मनात त्या शास्त्रज्ञाच्या हत्येचा विचार आला.

या प्रवासात सोबत असलेली अमेरिकेची इंजीनिअर फी सेमूर हिने एकैलीवर तयार करण्यात आलेल्या एका डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितलं होतं, “हा विचार आमच्या सर्वांच्या मनात एकत्र आला.”

स्वीडनच्या डायरेक्टर मार्कस लिंडिन यांनी या प्रयोगात सामिल असणाऱ्या सहा जणांची एकमेकांशी भेट घालून दिली होती.

जोर्नस्टाम यांनी मार्कस लिंडिन यांना सांगितलं की जिनोव्ज आपला प्रयोग पूर्ण करण्यासाठी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागू लागले होते. इतकंच नाही तर ते कॅप्टनलाही आव्हान देत होते.

जपानच्या इसुके यामाकीने सांगितलं, “त्यांच्या मानसिक हिंसेचा सामना करणं, फार अवघड होतं.”

याच कारणामुळे इतर सदस्यांच्या मनात त्यांच्या हत्येचा विचार आला. “त्यांना समुद्रात फेकून अपघात झाल्याचं सांगता येईल किंवा हार्ट अटॅक येईल असे एखादे औषध त्यांना द्यावे”, असा विचार लोक करू लागले होते.

फी सेमूर यांनी डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितलं, “असं केल्याने परिस्थिती आणखी चिघळेल, अशी भीती मला वाटत होती.”

मात्र, असं काही घडलं नाही. जिनोव्जचा विषय सामोपचाराने मिटवण्यात आला. जेव्हा एकैली मॅक्सिकोला पोचली तेव्हा या गटातल्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये अगदी वेगवेगळं भर्ती करण्यात आलं. त्यांच्या अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक चाचण्या करण्यात आल्या.

जिनोव्ज डिप्रेशनमध्ये गेले होते आणि सेक्स बोटच्या बातमीने तर त्यांच्या विद्यापीठानेही त्यांना दूर सारलं होतं.

मात्र, आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 2013 सालापर्यंत ते अकॅडमीच्या कामात सक्रीय होते.

त्यांच्यासोबत जी माणसं प्रयोगासाठी गेली होती त्यांच्यासाठी हा प्रवास एक धाडसी प्रवास ठरला.

‘यशस्वी प्रयोग’

या प्रवासादरम्यान काही कठीण प्रसंगही आले. मात्र, या गटात मतभेद झाले नाही. उलट त्यांच्यातले भावनिक संबंध अधिक दृढ झाले.

यामुळेच फी यांच्या मते हा एक यशस्वी प्रयोग होता.

ब्रिटीश वृत्तपत्र असलेल्या गार्डियनला त्यांनी सांगितलं, “जिनोव्ज यांचं लक्ष हिंसा आणि संघर्ष यावर केंद्रित होतं. मात्र, ‘अनोळखी’पणापासून सुरुवात करणारे सर्व नंतर ‘आम्ही’ झालो.”

लिंडिन यांनी याच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “ती माणसं त्या राफ्टवर का गेली होती, हे जिनोव्ज यांनी ऐकलं असतं तर त्यांना हिंसेचे परिणाम कळून चुकले असते. सोबतच हेही कळालं असतं की आपल्यातले मतभेद विसरून आपण हिंसेवरही मात करू शकतो.”