औरंगाबाद : सैराटफेम अभिनेता आकाश ठोसरच्या नावाने जवळपास ७ मराठी नावाने फेसबुक अकाउंट आहेत. यापैकी एका अकाउंटद्वारे काल रात्री औरंगाबाद येथे राहणाऱ्या एका महिला पत्रकाराकडे पैशाची मागणी करण्यात आली. याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.
काल रात्री ११ वाजताच्या सुमारास आकाश ठोसरच्या (परश्या) फेक फेसबुक अकाउंटच्या मेसेंजरवरून महिला पत्रकार जोशी यांना मी केरळमध्ये शूटिंगसाठी आलो आहे. माझं नेट बँकिंग बंद झालं असून मला २५०० रुपये पाठव असा मेसेज आला. त्यानंतर लगेच मोबाईल क्रमांक देखील त्याने पाठवला. अकाउंट फेक असल्याचं लक्षात आल्यावर जोशी यांनी त्याला २५०० नाही तर २५००० पाठवते असे सांगितले. त्यावर नको असा मेसेज आला. सैराटफेम आकाश ठोसर इतका गरीब कसा झाला आणि त्याचे नेट बँकिंग बंद आहे तर पाठवलेले पैसे कसे मिळतील असे अनेक प्रश्न जोशी यांना पडले. त्यानंतर महिला पत्रकार यांनी समोरील फसवत असलेल्या व्यक्तीस माझा नवरा पोलीस आहे अशी खोटी माहिती दिली. तो मेसेज वाचून समोर मेसेज करणाऱ्या व्यक्तीने सर्व मेसेज लगेच डिलीट केले आणि गायब झाला. अशा प्रकारे महिला पत्रकाराला फेक फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबत सायबर गुन्हे विभागात तक्रार करण्याबाबत जोशी यांना विचारले असता सध्या तरी काही विचार केलेला नाही अशी माहिती त्यांनी दिली.