अचानक केलं लग्न
जुलै महिन्यात साग्रसंगीत पद्धतीनं सोनाली आणि कुणाल विवाहबद्ध होणार होते. मात्र दोघांनी अचानक मे महिन्यातच लग्न करुन साऱ्यांना सुखद धक्का दिला. सोनालीनं स्वतः सोशल मीडियावर अचानक लग्न का केलं याची सविस्तर माहिती दिली. करोनाची सद्य परिस्थिती पाहता दोघांनी लग्नात फारसा खर्च न करण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात लग्न करण्याचं जवळपास सर्वकाही ठरलंही होतं. पण लग्न साधेपणानेच करायचं असल्यामुळे जुलैऐवजी मे महिन्यातच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
ही सगळी माहिती तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं त्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय, ‘नातेवाईकांचा प्रवास, आरोग्याची घ्यावी लागणारी काळजी, अनावश्यक खर्च, सरकारी नियम या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही मे महिन्यातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही एका तासात लग्नाची खरेदी केली आणि १५ मिनिटांत अवघ्या चार लोकांच्या साक्षीने मंदिरात वरमाळा, मंगळसूत्र आणि कुंकू या तीन गोष्टी घेऊन विवाह प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या.’ विशेष म्हणजे सोनाली आणि कुणालनं लग्नासाठी वापरण्यात येणारी रक्कम करोना विरुद्धच्या मदतनिधीसाठी देण्याचा निश्चय केला आहे.