Home ताज्या बातम्या सोन्याची घसरण सुरूच, 3 दिवसात तब्बल हजार रुपयांनी उतरलं सोनं

सोन्याची घसरण सुरूच, 3 दिवसात तब्बल हजार रुपयांनी उतरलं सोनं

0

नवी दिल्ली,: सोन्याच्या किंमतीमध्ये होणारी घसरण थांबण्याचं नाव नाही घेत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे.  मागणी घटल्यामुळे देशांतर्गत बाजारात आज सोन्याची किंमत (Gold Price today) घसरली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोनं तब्बल प्रति तोळा 396 रुपयांनी घसरलं आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातून कमी झालेल्या मागणीमुळे चांदीच्या किंमतीही घसरल्या आहेत. चांदीची किंमत प्रति किलो 179 रुपयांनी कमी झाली आहे. जगभरातील शेअर बाजारात गुंतवणूक वाढल्यामुळे त्याचा परिणाम सोनेचांदीच्या किंमतीवर झाला आहे. गेल्या 2 दिवसात सोन प्रति तोळा 784 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

सोन्याचे आजचे भाव

दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे भाव प्रति तोळा 41 हजार 267 रुपयांवरून 40 हजार 871 रुपयांवर पोहोचलं आहे. सलग 3 दिवस सोन्याच्या दरात घसरण होऊनही अद्यापही प्रति तोळा सोन्याचा भाव चाळीशीच्या पलिकडेच आहे. मंगळवारी सोन्याचे दर 388 रुपयांनी उतरले होते.

चांदीचे नवे दर

औद्योगिक मागणी घटल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात प्रति किलो चांदीची किंमत 179 रुपयांनी कमी झाली आहे. आजचे चांदीचे दर प्रति किलो 47 हजार 60 रुपयांवरुन 46 हजार 881 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी देखील चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती.

सोनेचांदी स्वस्त होण्याचे कारण

HDFC सिक्युरीटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातील किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे.