Home गुन्हा सोन्या-चांदीची दुकाने फोडून चोरट्यांनी साडेसात लाखांचे दागिने चोरुन नेले

सोन्या-चांदीची दुकाने फोडून चोरट्यांनी साडेसात लाखांचे दागिने चोरुन नेले

0

सोन्या-चांदीची दुकाने फोडून चोरट्यांनी साडेसात लाखांचे दागिने चोरुन नेले

वाई तालुक्‍यातील भुईंज येथील तीन सोन्या-चांदीची दुकाने फोडून चोरट्यांनी साडेसात लाखांचे दागिने चोरुन नेल्याची घटना बुधवार, 18 रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, शुभांगी ज्वेलर्स या दुकानूत चार लाखांचे तर ज्योती ज्वेलर्स या दुकानातून साडेतीन लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. तर सिद्धनाथ ज्वेलर्स या दुकानाचीही चोरट्यांनी तोडफोड केली मात्र याठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

अधिक माहिती अशी, भुईज हे वाई तालुक्‍यातील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे गाव असल्याने याठिकाणी विविध प्रकारे व्यापारी आपला व्यापार करत असतात. त्याचप्रमाणे याठिकाणी सोने-चांदीचा व्यापार करणारेही काही व्यापारी आहे. भुईंज येथे विजयकुमार महामुनी यांच्या मालकीचे शुभांगी ज्वेलर्स, तर डी. के. पोतदार यांच्या मालकीचे ज्योती ज्वेलर्स आणि बापूराव कदम यांच्या मालकीचे सिद्धनाथ ज्वेलर्सचे दुकान आहे.

बुधवारी नेहमीप्रमाणे या तीनही दुकानांचे मालक रात्री दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी शुभांगी ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे चार लाखांचे दागिने त्यानंतर ज्योती ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे साडेतीन लाखांचे दागिने लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी या दुकांपासून जवळच असणारे सिद्धनाथ ज्वेलर्स हे दुकानदेखील फोडले, मात्र याठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी दोन दुकानांमधून मिळालेला मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

गुरुवारी सकाळी सोन्या-चांदीची दुकाने फोडल्याचे बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित दुकान मालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर या तीनही दुकानदारांनी दुकानात येऊन पाहणी करत घडलेल्या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना दिली. चोरीची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्‍याम बुवा हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. श्‍वान दुकानातून बाहेर पडून पुण्याच्या दिशेला जाऊन पुन्हा गावात शिरला. दरम्यान, या चोरीप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, एकाच रात्रीत तीन दुकाने फोडल्याच्या घटनेने भुईंजसह परिसरात खळबळ उडाली आहे.