मद्यपींच्या उत्साहावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे विरजण
उस्मानाबाद । शीतलकुमार शिंदे : सोमवार पासून जिल्ह्यात कांही ठिकाणी कायदेशीर नियमांचे पालन करून दारू विक्रीची दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले होते. मात्र त्यात बदल करत बुधवार ६ मे पासून जिल्ह्यातील सर्व प्रकारची दारू दुकाने बंद करण्याचे आदेश आता निर्गमित करण्यात आला आहेत. यामुळे मद्यपींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्यविक्री दुकाने वगळून, जिल्ह्यातील इतर एफएल-२, सीएलएफएलटीओडी-३ अनुज्ञप्ती (वाईनशॉप), एफएलबीआर-२(बिअरशॉपी) व सीएल-३ अनुज्ञप्ती (देशी दारु किरकोळ विक्री दुकाने) सोमवारी ४ मे पासून सुरु करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.
आता मात्र या आदेशात अंशत: बदल करुन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ (१) च्या अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व देशी मद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (सीएल-३) देशी, विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-२, एफएल-३ व एफएल-४ सीएलएफएलटीओडी-३), तसेच बिअर किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएलबीआर-२) आणि एफएल-१, सीएल-२ या अनुज्ञत्या बुधवार ६ मे पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारीत केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा, १९४९ चे कलम ५४ व ५६ अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे.